Valpoi Sonal Road Flooding Pudhari Photo
गोवा

Valpoi Sonal Road Flooding | सोनाळ गावाचा संपर्क तुटण्याची भीती कायम

Valpoi Sonal Road Flooding | पावसाळ्यात रस्ता जातो पाण्याखाली : कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात सत्तरी तालुक्यातील सोनाळ व वाळपई दरम्यानचा रस्ता पाण्याखाली जात असल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे ग्रामस्थांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी रस्ता पाण्याखाली जातो, त्या ठिकाणी रस्त्याला उंची देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे.

मात्र, अद्यापही या मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पुन्हा एकदा हा रस्ता पाण्याखाली जाऊन सोनाळ गावाचा वाळपई शहराशी संपर्क तुटण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गतवर्षी रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर पुढील पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून देण्यात येते.

मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही ग्रामस्थांना या गंभीर समस्येचा सामना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळपई शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनाळ गावातील रस्ता पावसाळ्यात नियमितपणे पाण्याखाली जातो.

रस्त्याच्या बाजूने वाहणारी म्हादई नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. परिणामी, गावात जाणारा सुमारे ५० मीटर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जातो. अनेकवेळा रस्त्यावर एक मीटरपर्यंत पाणी साचत असल्याने पायी जाणेसुद्धा अशक्य होते.

सोनाळ गावातील ग्रामस्थांना वाळपई शहरात जाण्यासाठी या रस्त्याशिवाय अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे रस्ता बंद झाल्यानंतर गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. याचा फटका सरकारी कर्मचारी, विद्यार्थी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर जाणे शक्य होत नाही. गावातील दूध उत्पादकांना दूध पुरवठ्यासाठी तार-सावर्डे येथे जावे लागते.

मात्र, रस्ता बंद झाल्यास दूध पुरवठाही पूर्णपणे ठप्प होतो. यंदाही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास म्हादई नदीचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असून पुन्हा एकदा सोनाळ गावाचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.

गतवर्षी दोन दिवस तुटला होता संपर्क...

गतवर्षी सलग दोन दिवस सोनाळ गावाचा संपर्क तुटला होता. तसेच अधूनमधूनही संपर्क खंडित होण्याच्या घटना घडत असतात. ज्या ठिकाणी रस्ता पाण्याखाली जातो, त्या भागाला उंची दिल्यास ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांनीही गतवर्षी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत सार्वजनिक बांधकाम खात्याला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT