पणजी : राज्यात काही महिन्यांहून गाजत असलेल्या विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि उच्चस्तरीय तथ्य शोधन समितीने ठपका ठेवलेला निलंबित प्राध्यापक प्रणव नाईक याने पुन्हा एकदा पुलावरून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला वाचवले. काणकोण येथील सादोळशे पुलावरून त्याने उडी मारली, मात्र पोलिसांनी त्याला वाचवले. यापूर्वी म्हापसा पोलिस ठाण्यात प्रणव नाईक बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली असून आता आत्महत्येच्या प्रयत्नाचे खळबळजनक प्रकरण पुढे आले आहे. यापूर्वीही त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
ज्यावेळीही प्रकरण माध्यमांमधून समोर आले, त्यावेळी असे काही घडलेच नसल्याचे कुलगुरूंनी सांगितले. मात्र आता तथ्य शोधन समितीच्या अहवालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले असून याबाबत विद्यापीठाची अधिकृत बाजू काय? असे विचारले असता योग्य वेळ आल्यावर विद्यापीठाकडून भाष्य केले जाईल, असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत मोरजकर यांनी सांगितले. सांगण्यात आले.
अखेर तथ्य शोधन समितीच्या अहवालामध्ये पेपरचोरी प्रकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. अहवालानुसार संबंधीत प्राध्यापक विद्यार्थिनीला तिच्या घरी ने-आण करण्याचे कामही करत होता. तिच्यासाठी त्याने पेपर चोरले. हे सर्व डोळ्यांदेखत घडत असूनही व्यवस्थापनाने आणि मुख्यत्वे कुलगुरूंनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रजिस्ट्रार आणि कुलगुरूंवरही कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी केली आहे.