पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या एआय आधारित वाहतूक देखरेख प्रणालीद्वारे नोंदवण्यात येणाऱ्या वाहतूक नियमभंगावर तातडीने दंड आकारला जाणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. एआय कॅमेऱ्यांद्वारे तयार होणारी ई-चालने संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित झाल्यानंतरच वाहनचालकांना पाठविली जातील, असे परिवहन संचालक अरविंद खुटकर यांनी सांगितले.
दरम्यान, या निर्णयाचा यापूर्वी ऑनलाइन चलन देण्यात आलेल्या सुमारे ३५ हजार वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात एआय कॅमेरे सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच हजारो वाहतूक नियमभंगांची नोंद झाली. मात्र, प्रत्यक्षात अत्यल्प ई-चालने जारी झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने स्पष्टीकरण देत सध्या प्रणालीची तांत्रिक अचूकता, माहितीची पडताळणी आणि नेटवर्कची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. दंड वसूल करणे हा प्राथमिक हेतू नसून, नियमांचे पालन व्हावे यासाठी ही यंत्रणा विकसित केली जात आहे, असे खुटकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, संपूर्ण एआय नेटवर्क पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतरच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना स्वयंचलित पद्धतीने ई-चालने पाठविली जातील. त्यापूर्वी प्रणालीतील सर्व तांत्रिक बाबींची चाचणी आणि पडताळणी पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एआय कॅमेऱ्यांमुळे सध्या दंड होत नसल्याचा गैरसमज करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, मोटार वाहन नियमांचे पालन करा आणि अधिक सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयी लावा. हेल्मेट, सीटबेल्ट, वेगमर्यादा, सिग्नल आणि इतर वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे.
खुटकर म्हणाले की, एआय-आधारित वाहतूक व्यवस्थापन प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), गोवा वाहतूक पोलीस आणि परिवहन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प मेसर्स बेलटेकद्वारे राबवला जात असून, ते राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार न टाकता पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
खुटकर यांच्या मते, एआय-सक्षम वाहतूक कॅमेरा प्रणालींनी इतर अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणी सुधारून आणि चालकांच्या वर्तनावर प्रभाव टाकून सकारात्मक परिणाम दिले आहेत. त्यामुळे अखेरीस रस्ते अपघात कमी होण्यास मदत झाली आहे.
गोव्यात, वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी, रस्त्यावरील सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी जास्त रहदारीच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
वाहतूक संचालकांनी दावा केला की, गेल्या तीन वर्षांत राज्यातील रस्ते अपघातांमध्ये १७ टक्क्यांनी घट झाली आहे. या घटीचे श्रेय त्यांनी अधिक कठोर अंमलबजावणी, वाहतूक नियमांचे वाढलेले पालन आणि एआय-सक्षम वाहतूक व्यवस्थापन उपायांच्या वापराला दिले.