पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन खाते एआय-आधारित तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत एआय आधारित तंत्रज्ञानाचा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वापर करण्याची सूचना केली.
यावेळी पर्यटन खात्याचे अधिकारी, पोलिस महासंचालक आलोक कुमार, पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, जीइएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती कुमार आणि पर्यटक पोलिस अधिकारी उपस्थित होते.
विविध खात्यांच्या सहकार्याने एआय-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांची सुरक्षा वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे देखरेख अधिक सक्षम होऊन घटनांना जलद प्रतिसाद देणे शक्य होईल. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित प्रवास व वास्तव्याचा अनुभव मिळेल, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
पत्रकाराचा मोबाईल पाडणारा अटकेत:
बागा किनार्यावर पर्यटकांना बेकायदेशीर दलालांपासून सावध करणाऱ्या पत्रकाराच्या हातातील कॅमेरा पाडल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी निषेध केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पर्यटन क्षेत्राची प्रतिमा मलीन करणाऱ्या बेकायदेशीर दलालांविरोधात तातडीने कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.