गोवा

Goa news: होमस्टे, फार्म हाऊससाठीही हवे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र

गोव्यातील तत्सम आस्थापनांना अग्निशामक, विद्युत आणि संरचनात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पर्यटन उद्योगाशी संबंधित काही नाईट क्लबमध्ये सुरक्षा उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील हॉटेल्स, होममेस्टे, रॉक्स आणि वॉटर-स्पोर्टस् ऑपरेटर्सच्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे.

पर्यटन खात्याने आता गेस्ट हाऊस, होमस्टे आणि फार्म हाऊससाठी अग्निशमन आपत्कालीन सेवा संचालनालयाचा वैध ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) अनिवार्य केला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार आता फार्म हाऊस व त्यांच्या सभोवती असलेल्या मसाल्याच्या प्लॅन्टेशन्स आणि लहान होमस्टे यांनाही अग्निशमन ना हरकत दाखला सक्तीचा केला आहे.

व्यवसाय सुलभतेच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पर्यटन संचालक केदार नाईक यांनी विविध पर्यटन सेवांसाठी अनिवार्य कागदपत्रे सुलभ करण्यासाठी नवीन नियमांसह एक अधिसूचना जारी केली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन आस्थापनांना परवाने नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी केली. त्यानुसार हॉटेल्स, फार्महाऊस आणि होमस्टेना अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाकडून एनओसी सादर करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र आता ती सक्ती करण्यात आली आहे.

गोव्यातील तत्सम आस्थापनांना अग्निशामक, विद्युत आणि संरचनात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्यटन महामंडळाच्या या अधिसूचनेत म्हटले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात हडफडे येथे झालेल्या नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, गोवा पर्यटन विकास महामंडळाने जेथे पर्यटक जातात. राहतात अशा सर्वच जागी अग्निशमन परवाना सक्तीचा केल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक गॅविन डायस यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT