पणजी : राज्यात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला टॅक्सी चालकांचा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रश्न संबंधितांशी चर्चा करून सामंजस्याने सोडवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्य आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. पर्यटन व्यवसायात टॅक्सी चालकांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, या व्यवसायात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारतर्फे अॅग्रीगेटर अॅप सुरू करण्यात आले आहे. त्याला टॅक्सी चालकांचा विरोध आहे. मागील काही दिवसांपासून टॅक्सीचालक विविध लोकप्रतिनिधींना भेटत आहेत. हा प्रश्न आणि टॅक्सी चालकांच्या समस्या जाणून घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, राज्य सरकारतर्फे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याकडून अॅग्रीगेटर अॅपचे समर्थन करण्यात आले असून राज्यातील विविध उद्योग, संस्थांनीही अॅग्रीगेटर अॅपला पाठिंबा दिला आहे. यात गोवा चेंबर ऑफ कॉमर्स (जीसीसीआय) पासून लघुभारती, राज्य उद्योग असोसिएशन यांसारख्या महत्त्वाच्या उद्योग संस्थांचा समावेश आहे.
सरकारच्यावतीने राज्यात परराज्यातील अॅग्रीकेटर अॅप सुरू करून राज्यातील टॅक्सी व्यवसाय संपवण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप टॅक्सी चालकांनी करून अॅग्रीगेटर अॅपला विरोध कायम ठेवला आहे. त्यामुळे हा प्रश्न कसा सुटेल याच्या विवंचनेत राज्यभरातील उद्योजकही आहेत. सर्वांचे टॅक्सी चालकांच्या पुढील कृतीकडे लक्ष लागले आहे.