पणजी : राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, पुढील वर्षी ऊस उत्पादकांना 'गोड बातमी' मिळू शकते, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर बुधवारी शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ८४ व्या वार्षिक अधिवेशनाचे आणि आंतरराष्ट्रीय शुगर एक्स्पो २०२६ चे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी साखर उत्पादकांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील आघाडीचे साखर तंत्रज्ञ, अभियंते, संशोधक, साखर उत्पादक आणि उद्योगपती सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सरकार गांभीयनि प्रयत्न करीत आहे. देशात पेट्रोलमध्ये ई-२० मिश्रणाचा वापर वाढत असल्याने इथेनॉल निर्मितीला मोठी संधी निर्माण झाली आहे. साखर उत्पादकांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल निर्मितीकडेही लक्ष द्यावे. ऊस उत्पादकांनी 'अन्नदात्या बरोबरच 'ऊर्जादाता' होण्याची गरज आहे.
ऊस उत्पादन वाढविण्यासोबतच जलसंधारण, आधुनिक साखर निर्मिती तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादन आणि जैवऊर्जेच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. या सर्व विषयांवर अधिवेशनात तज्ज्ञांकडून विचारमंथन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'विकसित भारत २०४७'चे स्वप्न साकार करण्याबरोबरच २०३७ पर्यंत विकसित गोवा घडविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील ऊस उत्पादक, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनक्षमता वाढविणे आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भारताच्या साखर व संबंधित उद्योगांना १०० वर्षे सेवा देणाऱ्या या संस्थेचे अधिवेशन साखर उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. साखर कारखान्यांची कार्यक्षमता वाढविण्यापासून कृत्रिम बुद्धिमत्ता, इथेनॉल, जैवऊर्जा, जलसंधारण, हवामान अनुकूल ऊस लागवड आणि मूल्यवर्धित उत्पादनांपर्यंत विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
विविध पुरस्कारांचे वितरण...
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'मॉडर्न शुगरकेन मॅनेजमेंट' या पुस्तकाचे तसेच अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. साखर उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार आणि उद्योग उत्कृष्टता पुरस्कारही प्रदान करण्यात आले.