मडगाव ः केपे तालुक्यात पुन्हा गुंडागिरीने मान वर काढली आहे. कुख्यात गुंडांचा वापर करून अवैध रेती व्यवसाय सुरू करण्याची घटना ताजी असताना दंगामस्ती रोखण्यासाठी गेलेल्या केपे पोलिस स्थानकाच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करत चालक असलेल्या शिपायाला युवकांच्या जमावाकडून रस्त्यावरच बेदम मारहाण करण्याची घटना शिवनगर येथे घडली आहे.
या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस इतर संशयितांच्या शोधात आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान, शिवनगर-टाकी येथील फास्टफूडवर घडली. परवान्याशिवाय चालणार्या या फास्टफूड स्टॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे 12 युवकांचा गट आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होता. त्याचवेळी ब्रायन आणि फेलिक्स नावाचे दोन युवक त्या ठिकाणी आले असता वाट देण्याच्या मागणीवरून दोन्ही गटांमध्ये वाद उद्भवला. युवकांच्या गटाने दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरू केली. या घटनेची माहिती केपे पोलिसांना फोनवरून दिल्यानंतर केपे पोलिस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक पुंडलिक गावकर आणि पोलिस पेट्रोलिंग वाहनाचे चालक रोहन नार्वेकर हे ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. शिवनगर येथे पोचून गावकर यांनी त्या युवकांच्या गटाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकांनी त्यांना धक्काबुक्ककी करणे सुरू केले. पोलिसांनाच मारहाण करून पोलिस प्रशासनासमोरच आव्हान निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे.
गावकर यांना धक्काबुक्की होत असल्याचे पाहून त्यांना अडवण्यासाठी गेलेला चालक रोहन नार्वेकर यांच्या एका युवकाने थोबाडीत मारली. या मारहाणीत जमिनीवर कोसळलेल्या रोहन यांच्या कानाला जबर दुखापत झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मारहाण करणारे त्या युवकाला पोलिस पकडू शकले नव्हते. हा प्रकार त्या फास्ट फूड दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला असून पोलिसांनी ती फुटेज जप्त केली आहे.