MLA Govind Gawde 
गोवा

Goa ST Reservation | एसटी आरक्षणाची प्रतीक्षा न करता ताकद दाखवा; आमदार गोविंद गावडे यांचे आदिवासी समाजाला आवाहन

Goa ST Reservation | आमदार गोविंद गावडे यांचे आवाहन; वाडे कुर्डीतील मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

सांगे (पुढारी वृत्तसेवा): दुसऱ्यांच्या आधारावर आणि दुसऱ्यांना आधार देऊन निवडणुका लढवण्याचे दिवस आता संपले असून, 'आता आम्ही ठरवू तोच उमेदवार', असा ठाम निर्णय घेण्याची ही वेळ आली आहे. राखीवता मिळणार म्हणून प्रतीक्षा न करता, आता नाही तर पुढच्या निवडणुकीतसुद्धा राखीवता मिळणार नाही हे गाठीशी बांधून पुढील विधानसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार जिंकून आला पाहिजे, असा निर्धार करून शिल्लक दिवसांत रान उठवण्याचे आवाहन आमदार गोविंद गावडे यांनी केले.

वाडे कुर्डी येथील वसाहत क्रमांक एकमधील गणपती सभा मंडपात एसटी राखीवतेसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाश वेळीप, गोविंद शिरोडकर, जॉन फर्नांडिस, विश्वास गावडे, माजी आमदार प्रसाद गावकर, सुरेश केपेकर, नानू बांदोळकर, संतोष गावकर यांच्यासह इतर स्थानिक नेते उपस्थित होते.

गावडे पुढे म्हणाले की, समाजात फूट कशी घालावी हे आत्ताच्या राजकारण्यांकडून शिकावे. वाडे कुर्डीतील मेळावा आठ दिवस अगोदर नक्की केला असताना दुसरा कार्यक्रम आयोजित करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. समाजाला खोटी आश्वासने देऊन विस्कळीत केले जात असून, आपला समाज एकसंध होत नाही याचा फायदा घेत इतरांकडून पोळी भाजली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रकाश वेळीप म्हणाले की, आता अपेक्षा संपली असून, सर्व शक्ती एकवटून लढा देण्याची वेळ आली आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास कोणताही निर्णय घेता येतो. पण, गोव्यात तशी स्थिती राहिली नसून खरी शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. जॉन फर्नांडिस म्हणाले की, आपले मत विकून दुसरे मोठे झाले.

आता परत तशीच परिस्थिती निर्माण होणार असून, गरिबीचा फायदा घेण्यासाठी रात्रीच्या वेळी पाचशे रुपये दिले जातील. मात्र, इतकी खालची किंमत करून न घेता दिलेले पैसे तोंडावर मारण्याची धमक बाळगायला हवी, तरच किंमत येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार प्रसाद गावकर, सुरेश केपेकर व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना समाजाला एकजूट राखण्याचे आवाहन केले.

...तर शड्डू ठोकणार!

आदिवासी समाजाला येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळाले नाही, तर आदिवासीबहुल किमान २३ मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात शड्डू ठोकण्याचा निर्णय 'उटा' संघटनेच्या म्हार्दोळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला.

म्हार्दोळ येथील पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या 'उटा'च्या मेळाव्याला आमदार गोविंद गावडे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, रोमाल्डो गोन्साल्विस व उटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT