Court File Photo
गोवा

Goa ST Reservation | गोव्यातील एसटी आरक्षणाला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Goa ST Reservation | ही अंतरिम स्थगिती २४ डिसेंबरपर्यंत कायम ठेवताना गोवा सरकार व मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनला प्रतिवादी करून सात दिवसांत दोघांची बाजू ऐकण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) अंदाजित लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास स्थगिती दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या अंतरिम आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ही अंतरिम स्थगिती २४ डिसेंबरपर्यंत कायम ठेवताना गोवा सरकार व मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनला प्रतिवादी करून सात दिवसांत दोघांची बाजू ऐकण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

एसटी अंदाजित लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंतच्या मुदतीपर्यंत निकाल द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गोवा विधानसभेतील अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकार व मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन या दोन्ही याचिकांवर सुनावणी होऊन अंतरिम स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र एसटी समाजाचा भ्रमनिरास झाला आहे.

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याच्या प्रक्रियेसाठी राज्यातील एसटी लोकसंख्येची आकडेवारी महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने अंदाजित एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

मात्र, या प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्याला गोवा सरकार व मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन यांनी वेगवेगळ्या याचिका सादर करून अधिसूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.

एसटी राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेवर परिणाम

गोवा विधानसभेतील एसटी राजकीय आरक्षणासाठी लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी निश्चित होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे एसटी लोकसंख्येची अधिसूचना रखडल्याने पुढील आरक्षण प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच या प्रक्रियेला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT