पणजी : पुढारी वृत्तसेवा
इयत्ता नववीच्या दुसऱ्या सत्राच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे स्वातंत्र्य शाळांना दिले असले, तरी दर्जेदार असाव्यात, यासाठी गोवा शालान्त मंडळ सजक झाले आहे. विद्यालयांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांची मंडळाकडून विशेष समितीमार्फत छाननी केली जाणार असून या प्रश्नपत्रिका मंडळाच्या ब्ल्यू प्रिंटनुसार नसल्यास संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालान्त मंडळाने दिला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नववीच्या सत्रांच्या प्रश्नपत्रिका मंडळानेच काढण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, ताज्या निर्णयानुसार दुसऱ्या सत्राच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे अधिकार शाळांना देण्यात आले आहेत. असे असले तरी, प्रश्नपत्रिकांचा आराखडा आणि काठिण्य पातळी बोर्डाच्या मानकांनुसारच राखली जावी, यासाठी मंडळाने प्रत्येक विषयासाठी एक निश्चित ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे.
सर्व शिक्षकांना याच नमुन्याचे पालन करून प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गांभीर्य राखण्यासाठी मंडळाने शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. नववीची परीक्षा संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत प्रत्येक विद्यालयाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एका बंद पाकिटात सीलबंद करून शालान्त मंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
या प्रश्नपत्रिकांची तपासणी करण्यासाठी मंडळाकडून एका विशेष समितीची स्थापना केली जाणार आहे. ही समिती प्रत्येक शाळेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा आणि ती ब्ल्यू-प्रिंटनुसार आहे का, याची सखोल छाननी करेल.
४ मार्चपासून नववीची परीक्षा...
नववीची ही परीक्षा ४ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत होणार असून, मंडळाने त्याचे वेळापत्रक आधीच निश्चित केले आहे. या निर्णयामुळे आता शिक्षकांना प्रश्नपत्रिका तयार करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.