पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी सोहम नाईक याच्या पोलिस कोठडीत पणजी बाल न्यायालयाने आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असून, चौकशीला वेग आला आहे. दरम्यान, शुक्रवारी त्याच्यावर चौथा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास अधिक सखोल करण्यासाठी तसेच महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत कोठडी वाढवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असून, संबंधित घटनेतील सर्व पैलूंची छाननी करण्यात येत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून, दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून तपास जलद गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इन्स्टावरून माहिती गायब ; फोटोही बदलला
कुडचडेतील लैंगिक छळ प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन बाबी समोर येत आहेत. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात कोठडीत असलेल्या सोहम नाईक याच्या इन्स्टाग्राम पेजवरून त्याच्या संदर्भातील बरीच माहिती गायब झालेली असून नुकताच त्याचा प्रोफाईल फोटोही बदललेला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्वीचा फोटो बदलून बुलेटवर दंडाच्या स्नायूंचे प्रदर्शन घडवताना घातलेला त्याचा हा फोटो जणू कायद्याला आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे.
सुशांत नाईक यांचा भाजपशी संबंध नाही
देशभर गाजत असलेल्या कुडचडेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणातील संशयित आरोपी सोहम नाईक याचे वडील नगरसेवक सुशांत नाईक यांचा भाजपशी कोणताही संबंध नाही, असा थेट खुलासा करत पक्षाने या प्रकरणात हात वर केल्यामुळे बेडूक उड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या नगरसेवकावर अधांतरी लटकण्याची वेळ आली आहे. कुडचडेत आयोजित पत्रकार परिषदेला भाजपचे कुडचडेचे गटाध्यक्ष मनोज नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, नगरसेवक प्रदीप नाईक, आशिष करमली तसेच राजेंद्र वस्त उपस्थित होते.