- राजेंद्र पां. केरकर
गोव्यात वैशाखातल्या पहिल्या पक्षातील पंचमी डिचोलीतील शिरगावच्या लईराई देवीच्या धोंडाच्या जत्रेशी संबंधित असून या जत्रेस गोवा, कोकणातले हजारो भाविक व्रतस्थ होऊन उत्स्फूर्त सहभागी होतात. शिरगावची लईराई, मुळगावची केळबाई, मयेची महामाया, म्हापशाची मिराबाई, मोरजीची मोरजाई, मयेेची शितलाई, पाताळात गेलेली अजदीवा यांना गोवा - कोकणात सात बहिणी आणि त्यांचा एकुलता - एक भाऊ म्हणून वायांगिणीच्या खेतोबाला पुजले जाते.
या सात बहिणी घाट माथ्यावरून हत्तीवर आरूढ होऊन रामघाटातून कसई, गिरोडे, लाडफेमार्गे मचेतल्या वणड्यार इथे आल्या. त्या ज्या हत्तीवरती स्वार होऊन आल्या होत्या; त्याचा मृत्यू वणड्यार येथे झाला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ जांभ्या दगडात ऐरावताचे गजमुख कोरण्यात आल्याची लोकश्रध्दा मये आणि परिसरात रूढ आहे. मोरजी येथील काही अभ्यासकांच्या मते सात बहिणींच्या पूजन परंपरेत मोरजाईचा समावेश होत नसून, तिचे पूजन मोरजी येथे लईराई आणि तिची भावंडे याचे आगमन गोव्यात होण्यापूर्वीपासून प्रचलित आहे. काही अभ्यासक वेर्णाहून फोंड्याच्या म्हार्दोळयेथे स्थायिक झालेल्या म्हाळसादेवीचा सात बहिणींच्या संकल्पनेत समाविष्ट करतात.
ग्रीक संस्कृतीत आकाशाचा संरक्षक म्हणून ॲटलासकडे पाहिले जाते आणि त्याच्या सात मुलींना सात भगिनी म्हणून सन्मान दिला जातो. काही संशोधक आकाशात दृष्टीस पडणाऱ्या कृतिका पुंजातल्या सात तारकांतून सात बहिणीच्या पूजनाची परंपरा विकसित झाल्याचे मानतात. ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि आयर्लंड येथे सात डोंगरांना सात बहिणींच्या रूपात पाहिले जाते. आपल्या देशात उत्तर-पूर्वेकडच्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, आसाम, मणीपूर आणि मिझोराम या सात राज्यांना सात बहिणी म्हणून मानले जाते. आपल्या देशात सात बहिणी या सात ग्रामदेवता असून, विविध भागांत त्यांची स्थाने आहेत.
कोकणात ’एकेकाळी बंदर म्हणून नावारूपास आलेले चौल म्हणजे पूर्वाश्रमीची चंपावती नगरी असून, इथे सात बहिणींची मंदिरे आहेत. चंपावती, शीतला, एकवीरा, पद्मावती कळलागी, हिंगुळजा आणि चतुुर्सिती या ग्रामदेवतांचे पूजन सात भगिनी म्हणून केले जाते. दक्षिण भारतात कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडुत सात - बहिणींच्या पूजनाचे फार मोठे प्रस्थ आहे. या ग्रामदेवता तामसी आणि रोगांच्या अधिष्ठात्या म्हणून ख्यात आहेत. मरी किंवा शीतला थोरली भगिनी असून ती देवीच्या रोगाची व महामारीची देवता म्हणून ओळखली जाते. तेलंगणात पेड्डम्म, इसोदम्म् मरीअम्म, अंकलम्म, एल्लम्म, नकुलम्म आणि अरिकम्म या ग्रामदेवतांची सात बहिणीच्या रूपात पूजा केली जाते.
नेल्लोर जिल्ह्यात सात बहिणींना पॉलरम्म, अंकम्म, मुचिलम्म, टिळ्ळी पोळासी बंगारम्म माधम्म आणि रेणूका या नावांनी पुजले जाते. कर्नाटक राज्यातल्या म्हैसूर प्रांतात या सात बहिणींना मरीभगिनी म्हणतात. बिसलमरी ही तापाची, गुर्रलमरी ही दम्याची, केलमरी ही मातीच्या भांड्याची देवता म्हणून पुजतात, त्याशिवाय हिरी देवता, सरूगेरे मरी, चामुंडेश्वरी व उत्तनहळुळी अशी या सात बहिणींची नावे असून पोट्टूराजू हा त्यांचा भाऊ किंवा पती मानला जातो.
संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या रूपांत स्थानिक सात बहिणींची देवता म्हणून पूजा करतात. गोव्यातली सात भगिनी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ खेतोबा यांची पूजन परंपरा आम्हाला शेकडो वर्षांपासून इथे प्रचलित असलेल्या लोकधर्माच्या वैविध्यपूर्ण अशा वारश्याची प्रचिती आणून देतात. या सात बहिणींपैकी लोकमानस म्हापसा येथील सेंट जेरोम चर्चमध्ये अजलेल्या अवर लेडी ऑफ मिलाग्रीस या ख्रिस्ती देवतेला मिराबाई म्हणून पुजतात.देवी लईराईच्या जत्रेपूर्वी किंवा आसपास जेव्हा अवर लेडी ऑफ मिलाग्रीसचे फेस्त साजरे होते तेव्हा धर्म, पंथ ही भेदाभेद विसरून भाविक तिच्या मूर्तीवरती खोबरेल तेलाचा अभिषेक करतात आणि तिला आबोलीच्या फुलांचा गजरा अर्पण करतात. त्यानंतर येणाऱ्या लईराईच्या जत्रेसाठी मिराबाईकडून मोगरीच्या कळ्यांची पाठवणी केली जाते. शरीराचे जे अवयव ॲलोपॅथी आणि अन्य उपचार पद्धतीने वेदनामुक्त होत नाहीत; ते लोक या देवीकडे प्रार्थना केल्यावर आराम मिळाला तर नवसफेड करताना अवयवाच्या मेणाच्या प्रतिकृती अर्पण करतात. गोव्यातल्या सात बहिणी आणि त्याचा भाऊ खेतोबा यांची पूजन परंपरा मानवी समाजातल्या सात भगिनींच्या आलेल्या दैवतीकरणांच्या उन्नयन प्रक्रियेचे दर्शन घडवतात.