India Tea Statistics
पणजी : जगात असा एकही देश नाही जेथे चहा घेतला जात नाही. अधिकतर लोक दुधाचा चहा पसंत करतात. सर्वात जास्त चहा पिणारा देश चीन असून चिनी भाषेतही चहाला चहाच म्हणतात. भारतात चहा पिणार्यांमध्ये गुजरात पहिल्या स्थानी गोवा दुसर्या क्रमांकावर तर हरियाणा तिसर्या स्थानी आहे महाराष्ट्र मात्र सातव्या स्थानी आढळतो. टी बोर्ड ऑफ इंडिया यांनी या संदर्भातील केलेल्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे.
व्यसनाला जगात सर्वत्र बंदी आहे पण चहाच्या व्यसनाला माफी दिली जाते. कारण चहाच्या व्यसनाला व्यसन म्हटले जात नाही. विविध पद्धतीने चहा बनवला जातो पण सर्वात अधिक दुधाच्या चहाला पसंत केले जाते. दक्षिणेपेक्षा उत्तर भारतात चहाला अधिक पसंती आहे. पण दक्षिण भारतात खासकरून गिरनार येथील चहा आसाम आणि दार्जीलिंगपेक्षा उत्तम मानला जातो.
अनेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत चहाने केले जाते. पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये, अशी म्हणही आहे. त्यामुळे महिलांपेक्षा पुरुषच अधिक चहा पिताना आढळतात. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक चहा पिला जातो. तसेच दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात चहाला पसंती अधिक आहे. दक्षिण भारतात अधिकतर कशाय किंवा कॉफी पसंत केली जाते. अनेकांना चहाची इतकी आवड असते की ते दिवसातून अनेक कप पिताना आढळतात.
चीन, रशिया, जपान, कोरीया, पर्शिया, टर्की, बोस्निया तसेच अनेक देशांत चहाला चहाच म्हटले जाते. तर अरब देश कझाकिस्तान येथे चहाला शहा म्हटले जाते. चहा, आणि ग्रीन टी यांपैकी ग्रीन टी मध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते. ग्रीन टीमध्ये 47 मिलीग्राम कॅफिन असते. हे पचनासाठी फायदेशीर आहे. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि त्वचेसाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वजन कमी करायचे असेल तर सकाळी दुधाचा चहा न पिता ग्रीन टी घेतला जातो. पचन आणि पोटाशी संबंधित समस्या असतील तर चहा पिणे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. थकवा आणि सुस्ती वाटत असेल तर चहा उत्तम. भारतात लोकांच्या भावना चहाशी संबंधित आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांचा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही.असे काही लोक आहेत जे खूप चहा बनवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते गरम करतात आणि पुन्हा पुन्हा पितात. चहा पुन्हा गरम केल्यावर त्यातील चव, सुगंध आणि पोषक घटक नष्ट होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला चहा तयार करून 4 तास झाले असतील, तर चुकूनही तो पुन्हा वापरू नये.
चहा पिण्यात गोवा देशात दुसर्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी दिवसातून किमान सहावेळा चहा प्यायला जातो. जेवण संपताच लगेच ताटावरच गरमागरम चहा पिण्याची पद्धती पोर्तुगीजांनी आणली. ही पद्धत अजूनही काही ख्रिस्ती उच्चभ्रू कुटुंब पाळतात. युरोपमध्ये अनेक भागांत चहाला टी असा शब्दप्रयोग असला तरी पोर्तुगीज भाषेत मात्र चहाला चाव म्हटले जाते. गोव्यातही चहाला चावच म्हणतात.