बालरथ चालक, मदतनीसांना पोलिस पडताळणी अनिवार्य 
गोवा

Goa News : बालरथ चालक, मदतनीसांना पोलिस पडताळणी अनिवार्य

शिक्षण विभागाचे संचालक शैलेश झिंगडे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : बाल सुरक्षेच्या नियमांचे पालन करून आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियुक्त केलेल्या सर्व चालक आणि मदतनीसांसाठी, ज्यात बालरथ आणि इतर शालेय वाहतूक वाहनांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, त्यांना पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या संस्थाप्रमुख आणि व्यवस्थापनांना याद्वारे तत्काळ प्रभावाने काही बाबींचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये शालेय बस, व्हॅन, बालरथ वाहने आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही वाहनांवर कार्यरत असलेल्या सर्व चालक आणि मदतनीस किंवा परिचारकांसाठी पोलिस पडताळणी अनिवार्यपणे करून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत वैध आणि समाधानकारक पोलिस पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कोणत्याही चालकाला किंवा मदतनीसाला शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या कामात सहभागी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पोलिस पडताळणी वेळोवेळी नूतनीकरण केली जाईल आणि कोणत्याही चालक किंवा मदतनीसाच्या नवीन नियुक्तीच्या किंवा बदलीच्या बाबतीत ती नव्याने करून घेणे आवश्यक राहील. शाळा व्यवस्थापनाने सर्व चालक आणि मदतनीसांच्या पोलिस पडताळणी तपशिलांची योग्य नोंद ठेवावी. आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकरणाद्वारे तपासणीसाठी विचारल्यास ती सादर करावी. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेचे प्रमुख आणि शाळा व्यवस्थापनाची राहील. या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे कडक निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT