वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सहकार खात्याच्या साखळी येथील विभागीय कार्यालयात पूर्णवेळ साहाय्यक उपनिबंधक उपलब्ध नसल्यामुळे सत्तरी व डिचोली तालुक्यातील सहकारी संस्थांची गैरसोय होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागात पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्याने सहकारी संस्थांना विविध प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे सहकार खात्याने या कार्यालयात तातडीने पूर्णवेळ साहाय्यक उपनिबंधकांची नियुक्ती करावी, अशी मागणी सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सहकारी संस्थांचे दैनंदिन कामकाज, प्रशासकीय निर्णय, कायदेशीर प्रक्रिया, तसेच विविध प्रस्तावांच्या मंजुरीची कामे रखडत असल्याचे चित्र आहे.
अनेक संस्थांनी आपल्या संस्थांच्या नियमावलीत बदल करणे, संचालक मंडळातील आवश्यक बदलांची नोंद करणे. तसेच इतर प्रशासकीय बाबींसंदर्भात सहकार खात्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव साखळी येथील विभागीय कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
सहकार खात्याने तातडीने लक्ष देण्याची गरज
साखळी येथील विभागीय सहकार कार्यालयात पूर्णवेळ साहाय्यक उपनिबंधकाची नियुक्ती झाल्यास सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील सहकारी संस्थांचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागण्यास मदत होईल. तसेच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होऊ शकेल.
त्यामुळे सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साखळी येथील विभागीय सहकार कार्यालयातील साहाय्यक उपनिबंधकांकडे अन्य कार्यालयांचाही अतिरिक्त कार्यभार असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना साखळी कार्यालयातील कामकाजासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी, सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील सहकारी संस्थांना वेळेवर प्रशासकीय मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळण्यात अडथळे येत आहेत. मात्र, संबंधित कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेक संस्थांना आपल्या कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे सहकार खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यापूर्वीही अनेक संस्थांच्या संचालकांनी पूर्णवेळ साहाय्यक उपनिबंधक नियुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप संस्थांच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सहकार मंत्र्यांनी याकडे त्वरित लक्ष देत साखळीला पूर्णवेळ साहाय्यक निबंधक देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे