मडगाव - सावर्डे मतदारसंघातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. अनपेक्षित निकालांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. विद्यमान आमदार डॉ. गणेश गावकर तिसऱ्यांदा विधानसभा गाठण्याच्या तयारीत असताना माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रियता वाढविली आहे. दुसरीकडे, माजी मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांनाही राजकीय पुनरागमनाची आशा आहे. या तिघांच्या राजकीय हालचाली सुरू असतानाच संकेत आर्सेकर यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे सावर्डेतील भाजपच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून पक्षातील अनेक इच्छुकांच्या मनात अस्वस्थता पसरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मतदारसंघ हा थारबांदोडा तालुक्यातील सावर्डे गोव्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. या मतदारसंघाने अनेक वेळा राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकीचे ठरविले आहेत. राज्यातील इतर अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी सावर्डेने मात्र वेगळी राजकीय दिशा कायम ठेवली, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा दीर्घकाळ प्रभाव राहिलेल्या या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत भाजपने आपले संघटन बळकट करून मजबूत राजकीय पकड निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सावर्डेतील भाजपची उमेदवारी ही केवळ स्थानिक नव्हे, तर राज्यस्तरीय चर्वेचा विषय बनण्याची चिन्हे आहेत.
सध्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. गणेश गावकर हे पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांचा राजकीय प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. १९९४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांना अवधी ३५७ मते मिळाली होती. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले; मात्र त्यांना त्यावेळचे प्रभावी नेते विनय तेंडुलकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुढे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेग आला. २०१२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर ते प्रथमच विधानसमेत पोहोचले. मात्र २०१७ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दीपक प्रभू पाऊसकर यांनी त्यांना पराभूत करून सावर्डेत सत्ता परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर २०२२ मध्ये भाजपने पुन्हा गावकर यांच्यावर विश्वास दाखविला आणि त्यांनी विजय मिळवून मतदारसंघ पुन्हा भाजपकडे राखला.
तथापि, गेल्या काही वर्षांत मतदारसंघात निर्माण झालेल्या विविध वादांमुळे गावकर यांच्याबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विशेषतः दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना ने-आण करणाऱ्या सुमारे ४३० स्थानिक जीप मालकांचा प्रश्न राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरला. अनेक वर्षांपासून स्थानिक युवक आणि कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या या व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढविण्याच्या हालचालींना स्थानिकांनी विरोध केला होता. या वादामुळे अनेक जीप मालक आणि स्थानिक कुटुंबांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या घडामोडींची नोंद घेतल्याचे सांगितले जाते.
याशिवाय खनिज वाहतुकीशी संबंधित प्रश्न, स्थानिक गटबाजी, काही विकासकामांबाबतची नाराजी आणि पक्षांतर्गत मतभेद यामुळे गावकर यांना काही प्रमाणात राजकीय फटका बसल्याचे बोलले जाते. सावर्डे भाजप मंडळातील काही माजी पदाधिकाऱ्यांशी बिघडलेले संबंध आणि कार्यकर्त्यांमधील वाढती नाराजी याचाही परिणाम त्यांच्या राजकीय समीकरणांवर होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी पुन्हा एकदा सावर्डे मतदारसंघात लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा सदस्य आणि संघटनात्मक पातळीवरील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत ते स्थानिक राजकारणापासून काहीसे दूर असल्याचे चित्र होते. मात्र, अलीकडच्या काळात त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
विविध सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती वाढली असून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे माजी मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे नावही पुन्हा चर्चेत आले आहे. २०१७ मध्ये सावर्डेत विजय मिळवून त्यांनी मंत्रीपद भूषविले होते. मात्र २०२२ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची राजकीय घोडदौड थांबली. तरीही मतदारसंघातील काही भागांत त्यांचा प्रभाव कायम असल्याचे मानले जाते.
स्थानिक पातळीवरील त्यांचा जनसंपर्क आणि जुने कार्यकर्ते यामुळे ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या शर्यतीत उतरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. या सर्व राजकीय हालचालींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत संकेत आर्सेकर. संघाच्या शिस्तीत वाढलेले आणि दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव लाभलेले आर्सेकर यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये मोठे संपर्क जाळे निर्माण केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे त्यांनी कधीही निवडणूक लढविलेली नाही. कोणत्याही पदाची उघडपणे मागणी केलेली नाही. मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित आयोजित कार्यक्रमांनी सावर्डेच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना आर्सेकर यांच्या नावाभोवती निर्माण झालेली उत्सुकता पक्षांतर्गत समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
आर्सेकर यांची संघटनात्मक ताकद
आर्सेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील विविध भार्गातून कार्यकर्ते, समर्थक आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय निरीक्षकांच्या मते हा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नव्हता, तर संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन होते. सावर्डे मतदारसंघातील गावांमधून झालेली उपस्थिती आणि त्यातून व्यक्त झालेली राजकीय ऊर्जा यामुळे भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या कपाळावर आठ्या पडल्याची चर्चा आहे.
भाजप पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच
भाजप नेतृत्वासमोर सावर्डेच्या उमेदवारीबाबत मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांची कामगिरी, माजी खासदारांचा अनुभव, माजी मंत्र्यांचा प्रभाव आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा अशा विविध निकषांचा विचार करूनच पक्षाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. आगामी काही महिन्यांत सावर्डेतील राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असून उमेदवारीच्या चर्चेभोवतीच मतदारसंघातील राजकारण फिरताना दिसणार आहे.