साळ : डिचोली तालुक्यातील साळ येथील श्री महादेव भूमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार १६ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. सकाळपासून धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन असे विविध कार्यक्रम होणार आहे. येथील श्री महादेव व श्री भूमिका या दोन्ही मंदिरात सकाळी स्थल शुद्धीकरण, श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्र, आरती व तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. रात्री ११.३० वा. तरंग समवेत श्री पालखी मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळाकडून बहारदार नाट्यप्रयोग सादर केला जाईल.
त्यानंतर मंगळवार दि. १७ रोजी पहाटे गवळण काला होईल. तर सकाळपासून गावातील सुवासिनी व भक्तमंडळींकडून श्रीची खणा-नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम दुपारपर्यंत चालणार आहे. बुधवार १८ रोजी दुपारी समराधना घालून जत्रोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती श्री महादेव भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी दिली आहे.