पणजी, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवार, दि. 12 ते 14 जून या कालावधीत जी 20 देशांच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेच्या (एसएआय) गटाच्या शिखर परिषदेचे पणजी येथे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीचे अध्यक्षपद भारताकडे असून नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संस्थेचे (कॅग) गिरीश चंद्र मुर्मु उद्घाटनप्रसंगी भाषण करणार आहेत.
परिषदेत जी 20 देशांचे एसएआय सदस्य, आंतरराष्ट्रीय संस्था, प्रतिबद्धता गट आणि इतर निमंत्रित देशांच्या लेखापरीक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया, कोरिया प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, स्पेन, युएई, मोरोक्को आणि पोलंडच्या लेखापरीक्षण संस्थेचे सदस्यही वैयक्तिकरित्या सहभागी होणार आहेत.
परिषदेत ब्लू इकॉनॉमी आणि रिस्पॉन्सिबल कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा केली जाणार आहे. ब्लू इकॉनॉमीमध्ये सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करून आर्थिक वाढ, नोकर्या आणि उपजिविकेची अन्य साधने वाढवणे यांचा समावेश आहे. याशिवाय ऑडिट पद्धतीत एआय तंत्राचा वापर करून अधिक संधी शोधण्यात येणार आहे.