पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमधील भीषण आगीत २५ जणांचा बळी गेल्यानंतर या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. गोवा खंडपीठाने या याचिकेतील गंभीरता लक्षात घेत त्यावरील सुनावणी येत्या १६ डिसेंबरला ठेवली आहे.
या प्रकरणाची चौकशी न्यायिक आयोग अथवा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. याचिकेत आगीला कारणीभूत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत परवानाधारक प्रक्रियेतील त्रुटी तसेच राज्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल स्वतंत्रपणे निवृत्त उच्च न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी याचिकादाराने केली आहे.
भीषण आग लागलेल्या नाईट क्लबच्या ठिकाणी आत जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एकच दरवाजा असल्याने ही दुर्घटना घडली. आग लागल्यावर तेथील पर्यटकांसह इतर लोकांची धावपळ सुरू झाली. क्लबच्या तळघरातील स्वयंपाकी खोलीत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास वेळच न मिळाल्याने ते आगीच्या धुरामुळे गुदमुरून मरण पावले.
नाईट क्लबच्या बांधकामाला परवानगी देताना इमारत बांधकाम नियमांचे पालन केले की नाही याची तपासणी संबंधित अधिकाऱ्याने केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे. याचिकेत अधिकाऱ्यांकडून कथित बेकायदेशीर बांधकाम, परवाना त्रुटी व कर्तव्यात निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली असून अशा बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्यव्यापी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व नाईट क्लब, हॉटेल्स, बार व रेस्टॉरंट्स, बीच हाऊस व सार्वजनिक इमारतींचे सर्वंकष अग्नि सुरक्षा ऑडिट करण्यात यावे. बांधकाम परवाना, भोगवटा (ओक्युपन्सी) किंवा अग्निसुरक्षा नियमांचे पालन करत नसलेली आस्थापने तात्काळ बंद किंवा पाडण्यात यावी. राष्ट्रीय आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) याच्या नियमानुसार मोठ्या धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठी गर्दी व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारने तातडीने जारी करावीत व ती अमलात आणण्यासाठी पावले उचलण्यात यावीत. या नाईट क्लबमध्ये निष्पाप बळींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.