पणजी : पर्वरी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, १९ मार्चपर्यंत काही प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केला आहे.
उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी दामियान द गोवा परिसरात पी-२० ते पी-२४ (युंदाई शोरूमपर्यंत) हा रस्ता बंद राहणार असून, येथील वाहतूक पर्यायी मागनि वळवण्यात येईल. तसेच, ओ कोकेरो जंक्शन ते डॉ. अनिल डी सिल्वा यांच्या दवाखान्यापर्यंतचा रस्ताही बंद राहणार आहे. या ठिकाणीही वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
धूळ प्रदूषण टाळण्यासाठी संबंधित रस्त्यांवर दिवसातून दोन वेळा पाणी शिंपडण्यात येईल. ब्रिज सेगमेंटची वाहतूक दिवसा केली जाणार नाही. आपत्कालीन सेवांसाठी रुग्णवाहिका व अग्निशमन दलासाठी स्वतंत्र लेन राखीव ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, कदंब महामंडळाच्या बसेस पर्वरी डेपोऐवजी इतर डेपोकडे वळवण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.