Accident File Photo
गोवा

Goa Road Accidents | गोव्यात रस्ते अपघातात वाढ, पण मृतांची संख्या घटली; पोलिस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांची माहिती

Goa Road Accidents | गोव्यात यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यांत मोटार वाहन अपघातांची संख्या वाढली असली, तरी अपघाती मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यांत मोटार वाहन अपघातांची संख्या वाढली असली, तरी अपघाती मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यात १,००५ अपघातांची नोंद झाली, तर २०२५ मध्ये याच कालावधीत ९९५ अपघात झाले होते. मात्र, गंभीर जखमींची संख्या १३० वरून १७३ वर पोहोचल्याने रस्ते सुरक्षेचे आव्हान कायम आहे, अशी माहिती दक्षिण गोवा वाहतूक पोलिस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली आहे.

दोन्ही वर्षांत प्राणघातक अपघातांची संख्या ९२ इतकीच राहिली. मात्र, मृतांची संख्या २०२५ मधील ९६ वरून २०२६ मध्ये ९१ वर आली. त्यामुळे मृत्यूंमध्ये पाचने, म्हणजे ५.२ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे, गंभीर जखमींच्या संख्येत ४३ ने वाढ झाली असून, ही वाढ सुमारे ३३.१ टक्के आहे.

अपघातांच्या संख्येत टीसी फोंडा आघाडीवर असून, तिथे १५९ अपघात नोंदवण्यात आले. त्यानंतर टीसी मडगावमध्ये एमटीपीएस येथे १००, कुंकळ्ळी येथे ९६ आणि एमसीपीएस येथे ८९ अपघातांची नोंद झाली. स्वतःच्या कारणामुळे झालेल्या प्राणघातक अपघातांतील मृतांची संख्या यंदा २८ राहिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ३६ होती. म्हणजे अशा मृत्यूंमध्ये आठने घट झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जनजागृतीसाठी वाहतूक कक्षांनी व्यापक उपक्रम राबवले. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोड सेफ्टी सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील नऊ वाहतूक कक्षांनी एकूण ११६ व्याख्याने घेतली. यापैकी ४१ व्याख्याने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये झाली.

त्यात २९६ शिक्षक आणि ४,४८० विद्यार्थी सहभागी झाले. तसेच ३४७ टॅक्सी व रिक्षाचालक, कदंब तसेच खासगी बसचालकांसह १९६ बसचालक आणि सुमारे ५०० नौदल पोलिस कर्मचारी व अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच खासगी कंपन्यांमध्येही व्याख्याने घेण्यात आली.

विमा उल्लंघनासह विविध नियमभंगांत वाढ:

सप्टेंबरमधील वाहतूक कारवाईत मद्यप्राशन करून वाहन चालविणे, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे, बदललेले सायलेन्सर आणि विमा उल्लंघनासह काही नियमभंगांवरील कारवाई वाढली. मात्र, नो-एंट्री, नो-पार्किंग, अडथळा निर्माण करणारे पार्किंग, अनाधिकृत पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर आणि अयोग्य क्रमांकफलक यांसारख्या उल्लंघनावरील प्रकरणांत घट झाली, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT