पणजी : पुढारी वृत्तसेवा
गतवर्षी राज्यभरात एकूण ५२५ अपघात होऊन त्यात ३३५ जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच या अपघातांत रेंट अ कार, बाईक आणि पर्यटक टॅक्सी अशा २७ वाहनांचा समावेश असल्याचे उत्तर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाला दिले. आमदार विजय सरदेसाई यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. राज्यात गतवर्षी किती अपघातांची नोंद झाली? त्यात कोणकोणत्या प्रकारच्या वाहनांचा समावेश होता? वाढते अपघात आणि त्यातील बळींची संख्या रोखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? असे प्रश्न आमदार सरदेसाई यांनी विचारले होते. त्यावर मंत्री गुदिन्हो यांनी आकडेवारी सादर केली. गतवर्षी राज्यात झालेल्या अपघातांपैकी ७५ टक्के अपघात हे निष्काळजीपणे वाहने चालविल्यामुळे झालेले आहेत, असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत सांगितले. सादर झालेल्या आकडेवारीनुसार अपघातातील वाहने आणि संख्या अशी आहे. स्थानिक दुचाकी ४७१, दुचाकी टॅक्सी ३, रेंट अ बाईक ४, खासगी चारचाकी २११, काळी-पिवळी टॅक्सी १, पर्यटक टॅक्सी १४, रेंट अ कार ९, चारचाकी प्रवासी वाहने २, चारचाकी मालवाहतूक वाहने १५, प्रवासी बसेस ३१, अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने ५८. गतवर्षी राज्यभर ५२५ अपघात होऊन त्यात ३३५ जणांचा मृत्यू झाले. यातील ७५ टक्के अपघात निष्काळजीपणे वाहने चालविल्यामुळे, ३७ अपघात योग्य खबरदारी न घेता वाहने चालविल्यामुळे, ७१ स्वयंअपघात झाले. अपघात आणि अपघाती मृत्यूंवर दरम्यान, राज्यातील वाढते नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या ठिकाणी तैनात केले जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक कायद्याच्या नियमित अंमलबजावणी व्यतिरिक्त चालकांत वेळोवेळी जागरूकता केली जात आहे. अपघातांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून अपघातप्रवण क्षेत्रे हटवली जात आहेत, असेही मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे.