पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात रेंट अ बाईक, रेंट ए कॅब (कार) द्वारे पर्यटकांना भाड्याने दुचाकी व कार दिली जातात. मात्र, अनेक पर्यटक आपण नेलेल्या वाहनाला अपघात करतात आणि आपण दिलेली ओळखपत्रे घेण्यासाठी किंवा थकीत रक्कम भरण्यासाठी परत न येता भाड्याने घेतलेली वाहने मिळेल तिथे सोडून आपल्या गावी जातात. त्यामुळे वाहन मालकांना मोठे नुकसान सोसावे लागते, अशी कैफीयत अनेक रेंट अ बाईक व कार मालकांनी केली आहे. दर महिन्याला सुमारे २० ते २५ टक्के पर्यटक आपले आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे भाड्याने टॅक्सी देणाऱ्या कंपन्यांकडून नेत नाहीत. उत्तर गोवा रेंट-ए-कॅब संघटनेचे अध्यक्ष नितेश चोडणकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अनेक प्रकरणांमध्ये गाड्या विमानतळावर किंवा होम-स्टे जवळ सोडून दिल्या जातात, कधीकधी चाव्यांसहीत गायब होतात आणि त्यानंतर कोणताही संपर्क होत नाही. ज्यांच्याशी संपर्क होतो व त्यांनी फोन उचलले, तर नुकसानीची भरपाई देण्याच्या अटीवर आम्ही त्यांची कार्डे कुरिअरने पाठवण्याचा प्रयत्न करतो. काही जण तयार असतात, तर काही जण गोव्यात प्रभावशाली पोलिस किंवा प्रशासकीय प्रतिनिधी असल्याचा किंवा घरी राजकीय ओळखी असल्याचा दावा करून नकार देतात, असे चोडणकर म्हणाले.
... म्हणून पर्यटक कागदपत्रे नेत नाहीत : नार्वेकर
गोवा पोलिस उपअधीक्षक (वाहतूक) सुदेश नार्वेकर यांनी सांगितले की, प्रकरणे स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवली जातात. ही प्रकरण कधीच पुढे जात नाही. आधार कार्ड, मतदानकार्डची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून त्याच्या अनेक प्रिंटस् काढता येतात, त्यामुळे काही पर्यटक ते घेण्यासाठी परत येत नाहीत, असे ते म्हणाले
नाहक पोलिस कारवाईचा पेच
गोव्यात रेंट अ कॅब टॅक्सी सुमारे १० परवानाधारकांद्वारे चालवली जाणारी ६००० हुन अधिक वाहने आहेत. वाहन भाड्याने देताना दिवसाचा दर ठरवून पर्यटकांकडून ओळखपत्र घेतले जाते. त्यात आधार कार्ड, मतदान कार्ड आर्दीचा समावेश असतो. मात्र काही पर्यटक नेलेल्या वाहनाचा अपघात करतात व दिलेली ओळखपत्रे न नेता व वाहन तेथेच टाकून जातात. ज्याचा फटका वाहन मालकांना बसतो. पोलिस कारवाईला सामारे जावे लागते. त्यामुळे यावर योग्य ते कायदे हवेत, असे चोडणकर म्हणाले