महाराष्ट्रातील तब्बल दीड कोटी शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी अपूर्ण  Pudhari File Photo
गोवा

Goa Ration Card Update | नवीन रेशन प्रणालीमुळे ग्राहक त्रस्त

डोळे पडताळणी प्रक्रिया गुंतागुंतीची ; तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

हरमल : येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना धान्य वितरणासाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात आली असून, त्यामुळे ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. परिणामी, नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या महिन्यापासून रेशनकार्डधारक कुटुंब प्रमुख किंवा ज्येष्ठ व्यक्तीला विशेष उपकरणाद्वारे डोळ्यांची पडताळणी करावी लागत आहे. यासाठी प्रथम उजवा किंवा डावा डोळा मशीनसमोर धरावा लागतो. त्यानंतर ब्ल्यू लाईट दिसेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते आणि दोनदा ब्ल्यू लाईट ब्लिंक झाल्यानंतर ग्रीन लाईट आल्यावर प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहक धान्य उचलण्यास पात्र ठरतो. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ग्राहकांना हे उपकरण डोळ्यांसमोर लावताना भीती वाटत असल्याने, काही जण धान्य घेण्यासही टाळाटाळ करत असल्याचे ग्राहक डुमिंग फर्नांडिस यांनी सांगितले.

पूर्वी अंगठ्याचा ठसा देऊन किंवा आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईलवर संदेश येताच धान्य मिळत होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून नवीन पद्धत लागू केल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. दीर्घ प्रतीक्षा, वेळेची नासाडी आणि प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर उपकरण 'मेक इन कोरिया' असल्याचे सांगितले जात असले तरी, याद्वारे नेमका कोणता डेटा घेतला जातो याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याने नवीन प्रणालीबाबत वेळोवेळी जनजागृती करावी, तसेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अनेकांच्या मते, पूर्वीची अंगठा पडताळणी पद्धत अधिक सोपी व सुरक्षित असल्याने ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT