पणजी : पणजी परिसरात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानीसह मिरामारमधील सेंट मेरी कॉलनी, कांपाल कॉलनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, घरांमध्येही पाणी शिरल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रात्रीच्या पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे कॉलनीतील रस्ते पूर्णतः जलमय झाले आहेत. यात वाहने अडकली तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कॉलनीतील नाल्यांची योग्य सफाई न झाल्याने दर पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवते, असा आरोप त्यांनी केला आहे.
रायबंदर-पाट्टो परिसरात राम मंदिराजवळील एका घराची संरक्षक भिंत (रेटेनिंग वॉल) मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीचे मोठे अवशेष थेट मुख्य रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.
घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, संबंधित रस्ता काही वेळासाठी बंद करण्यात आला आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या घराशेजारील आणखी एक घर अतिशय धोकादायक स्थितीत असून, त्याच्या कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पथक पाठवले असून, भिंतीचे अवशेष हटवण्याचे व रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोसळणार्या मुसळधार पावसामुळे बांबोळी ते गोवा विद्यापीठ दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पाण्यामुळे वाहनचालकांची मोठी अडचण झाली असून, काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी भरल्याने वाहनांना रस्ता ओळखणे कठीण जात असून, काही दुचाकी चालकांना खोळंबून राहावे लागले. स्थानिक प्रशासन व वाहतूक विभागाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाणी उपसण्याचे व वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भागात वारंवार होणार्या पाणथळाच्या समस्येमुळे विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी आणि कर्मचार्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मुसळधार पावसाने बेतीमधील ‘चाय पानी’ रेस्टॉरंटजवळ, गुरुद्वाराच्या नजीक एक मोठे चिकूचे झाड पडले, हे झाड कंपाऊंड वॉलवर पडल्याने त्याचा काही भाग थेट मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पर्वरी अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होत झाड हटवण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही दुखापतही झाली नाही.