Goa 
गोवा

Goa-पर्वरी उड्डाणपूल डेडलाईनपूर्वी पूर्णत्वास

मंत्री दिगंबर कामत : हॉटमिक्सिंग डांबरीकरण कामाचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

पणजी: पर्वरी येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सुमारे ४०० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रकल्पाचे उद्घाटन येत्या चतुर्थीपूर्वी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केली. पुंडलिक नगर बाजूने गुरुवारी या उड्डाणपुलाच्या हॉटमिक्सिंग डांबरीकरणाचा शुभारंभ कामत यांच्या हस्ते झाला.

यावेळी पर्वरीचे आमदार तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे, साळगावचे आमदार केदार नाईक, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित

होते. कामत यांनी सांगितले की, हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. विविध कारणांमुळे आणि अतिरिक्त कामांमुळे प्रकल्पाला काहीसा विलंब झाला असला, तरी तो लवकरच पूर्णत्वास नेऊन चतुर्थीपूर्वी उद्‌घाटन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होत असून, पर्वरी एलिव्हेटेड कॉरिडॉर हा त्यातील एक महत्त्वाचा नमुना ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी मंत्री रोहन खंवटे आणि आमदार केदार नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटदाराने दर्जेदार काम केले असून, पायाभूत सुविधा विकास हा राज्याच्या आर्थिक प्रगतीस चालना देणारा महत्त्वाचा घटक असल्याचे कामत यांनी अधोरेखित केले.

याशिवाय, दक्षिण गोव्यातील दाभोली पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मडगावजवळील राजी जंक्शन ते नावेली या सहा पदरी उड्डाणपुलास मंजुरी मिळाली असून, जुने गोवे ते फोंडा चौपदरी रस्त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे गती मिळाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तीन हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे

राज्यातील नव्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांसाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा आराखडा गोवा सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती कामत यांनी दिली. पंतप्रधान सडक योजनेसाठी यापूर्वी १०५ कोटी रुपये मंजूर झाले होते; मात्र आचारसंहितेमुळे प्रक्रिया लांबणीवर पडून ती रक्कम परत गेली. त्यानंतर दिल्लीमध्ये शिवराज सिंग चव्हाण यांची भेट घेऊन १०२ कोटी रुपयांची नव्याने मंजुरी मिळवण्यात आली असून, त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT