Arrested Pudhari
गोवा

Porvorim Firing Case | पर्वरी गोळीबार प्रकरणात मुख्य सूत्रधार गोपाळ नाईक जेरबंद; साधूच्या वेशात गोव्याबाहेर पळण्याचा प्रयत्न

क्राईम ब्रँचने कुळे तपासनाक्यावर आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

Goa Firing Accused Gopal Naik Arrested

पणजी : पर्वरी येथील निओ मॅजिस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर हॉटेलबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित गोपाळ नाईक (कुंडई) याला गुन्हे शाखेने अटक केली. साधूच्या वेशात वाहनातून गोव्याबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कुळे तपासनाक्यावर बुधवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पलायनास मदत करणारा सुशांत हरिजन आणि वाहनचालक रामदास मिराशी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर गोपाळ नाईक पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सातत्याने ठिकाणे बदलत होता. बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि जगन्नाथ पुरी या शहरांमध्ये त्याने आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तो पुन्हा गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्याने राज्यातील पोलिस ठाणी तसेच सीमावर्ती तपासनाक्यांवर सतर्कता वाढवण्यात आली होती.

दरम्यान, कुळे तपासनाक्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. एका वाहनाची तपासणी करताना त्यातील तिघांच्या चौकशीत त्यांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. वाहनाच्या मागील आसनावर साधूच्या वेशात बसलेल्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आल्याने त्याची झडती घेण्यात आली. चौकशीत तो गोपाळ नाईक असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

अटकेनंतर गोपाळ नाईक याला पुढील चौकशीसाठी रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सुशांत हरिजन आणि वाहनचालक रामदास मिराशी यांची पर्वरी गोळीबार प्रकरणातील नेमकी भूमिका काय होती, याचाही तपास सुरू आहे. या दोघांचा गोळीबाराच्या कटात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सतीश शिंदेच्या जबाबातून नाईकचा सहभाग उघड

पर्वरी गोळीबार प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सतीश शिंदे याची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असताना गोपाळ नाईकच्या सहभागाची माहिती समोर आली होती. शिंदेच्या जबाबासोबतच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने नाईकचा शोध सुरू केला होता.

गोळीबाराच्या घटनेत नाईकची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय असल्याने त्याच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले होते. तो गोव्यात परतत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीमावर्ती तपासनाक्यांवर सापळा रचला. साधूच्या वेशात राज्याबाहेर पसार होण्याचा त्याचा प्रयत्न गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे फसला आणि अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT