पणजी : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी समाज आणि गोव्याच्या हितासाठी आपण आमदार गोविंद गावडे सोबत दिलजमाई केली आहे. गावडे व आपल्यातील मतभेद मिटवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिली. त्यामुळे गेली काही वर्षे तवडकर व गावडे यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपल्यात जमा असून भविष्यात हे दोन्ही एसटी समाजाचे नेते एकत्रित काम करणार आहेत.
मंगळवारी पर्वरीत मंत्रालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना तवडकर म्हणाले की, आपल्यातील व गोविंद गावडे यांच्यातील सर्व गैरसमज दूर झाले असून, समाज आणि राज्याच्या व्यापक कल्याणासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. आता सर्व समाज नेते एकत्रितपणे काम करतील.
गोविंद गावडे यांना आपला पाठिंबा आहे व यापुढेही असेल, असेही ते म्हणाले. गेली काही वर्षे तवडकर व गावडे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. दोघेही एकत्र कुठल्याच कार्यक्रमाला जात नव्हते. आदिवासी समाजासाठीचे विविध कार्यक्रम वेगवेगळे आयोजित केले जात होते. या वादामुळे तवडकर यांनी उटा या आदिवासी संघटनेपासून दूर राहणे पसंत केले होते. २०२२ मध्ये गोविंद गावडे यांना मंत्रिपद दिले गेले.
मात्र, सभापतीपदी निवड झालेले रमेश तवडकर यांच्या सूचनेमुळेच गावडे यांच्याकडे आदिवासी खाते दिले गेले नाही, असा आरोप गावडे यांचे समर्थक करत होते. यातूनच या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष वाढत गेला. त्यात भर म्हणजे वर्षभरापूर्वी गावडे यांचे मंत्रिपद काढून घेत ते तवडकर यांना देण्यात आले. यावेळी तवडकर यांच्याकडे आदिवासी खाते दिले गेले. गावडे यांचे मंत्रिपद काढून ते तवडकर यांना दिले गेल्याने या दोन्ही नेत्यांतील वाद विकोपाला गेला होता.
दोन्ही नेते एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत होते. मंत्रिपद काढल्यानंतर गावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण शेवटी या दोन्ही नेत्यांत समेट झाल्यामुळे आदिवासी समाज एकसंध होण्यास मदत होणार आहे. उटाचे अध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश वेळीप, सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर या आदिवासी नेत्यांची साथ तवडकर व गावडे या दोन्ही नेत्यांना मिळणार आहे.
एसटींना आरक्षण मिळणारच...
गोव्यात आदिवासींसाठी राजकीय आरक्षण जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच गोव्यातील एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. हे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे, अशी माहिती तवडकर यांनी दिली. राजकीय आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर आहे. आपण सातत्याने राज्य व केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. एसटींना निश्चितपणे आरक्षण मिळणार असल्याचे तवडकर म्हणाले.