पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसांमध्ये एकमेकांच्या घरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी भेटी देऊन स्नेहभोजनांचा आस्वाद घेतला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावला येथील विश्वजित राणे यांच्या घरी भेट दिली होती आणि जेवणाचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी राणे यांनी डॉ. सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. जेवणानंतर दोन्ही नेत्यांत राजकीय चर्चाही रंगली होती.
त्यानंतर मंगळवारी (दि. २४) आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थान महालक्ष्मी वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिव प्रकाश उपस्थित होते. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये ठोस राजकीय चर्चा रंगली. येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात व विविध विषयांवर विचारमंथन केले.
गेली काही वर्षे विश्वजित राणे आपण स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात होते आणि त्यामुळेच त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा होत होती. मुख्यमंत्र्यांनी गोवा कर्मचारी भरती आयोग स्थापन केल्यानंतर तर राणे हे फारच नाराज झाले होते.
त्यांना स्वतःच्या मर्जीतील उमेदवारांना सरकारी नोकरी देता येत नसल्यामुळे अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी जाहीर सभेत व्यक्त केली होती. जर सरकार आपल्या लोकांना नोकऱ्या देत नसेल तर हे सरकार कशाला हवे असेही राणे बोलून गेले होते.
मात्र, हल्लीच्या काळात राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नेतृत्व मान्य करत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉ. प्रमोद सावंत हेच भाजपचे नेतृत्व करतील आणि निवडणुकीनंतरही तेच नेतृत्व करतील अशी विधाने केली होती. आता एकमेकांच्या घरी स्नेहभोजन घेऊन दोन्ही नेत्यांनी दिलजमाई केल्याचे दिसून आले.