Goa News Pudhari
गोवा

Goa Politics | राज्यातील राजकारणाला लागली 'वाळवी'

Goa Politics | भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी : कॉक्रोच-वाळवी श्रेष्ठत्वावरून जुंपली

पुढारी वृत्तसेवा

  • ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या पोस्टमुळे वाद

  • काँग्रेस, आपकडून माफीची मागणी

  • भाजपकडून सावईकर यांची पाठराखण

पणजी : पुढारी वृत्तसेवा

'नीट' पेपरफुटीवरून नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत घमासान सुरू असताना राज्यात भाजपचे माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी केलेल्या वाळवीच्या पोस्टमुळे राजकीय वादळ उठले आहे. त्यातच कॉक्रोच हे वाळवीपेक्षा धोकादायक असते, असे वक्तव्य करून सावईकर यांची तळी उचलून धरत भाजपचे सरचिटणीस माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या वादात उडी घेतली आहे. राज्यातील राजकारणाला वाळवी लागल्याची चर्चा यामुळे होत आहे.

विद्यार्थ्यांना 'वाळवी'ची उपमा दिल्याचा दावा करत आम आदमी पक्षाने हा युवकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे राज्य कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी आंदोलनातील युवकांना वाळवी संबोधल्याबद्दल सावईकर यांचा निषेध केला. त्यांनी २४ तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अशी मागणी कवठणकर यांनी केली आहे.

हक्कांसाठी आणि भविष्यासाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या युवकांना 'वाळवी' ठरवणे हा सावईकर यांचा उद्धटपणाचा नाही, तर लोकशाहीचा अपमान आहे, असे नमूद करत कवठणकर म्हणाले की, खरी वाळवी तर ती आहे, जी आपल्या संस्थांना पोखरत आहे. लोकशाहीला कमकुवत करीत आहे, राष्ट्रीय संपत्ती विकत आहे, पर्यावरणाचा नाश करत आहे आणि राजकीय फायद्यासाठी लोकांमध्ये फूट पाडत आहे. भाजप हाच पक्ष आहे जो करकोचाप्रमाणे भारताच्या आत्म्याला पोखरत आहे.

गोव्याचे तरुण वाळवी नाहीत, ते आदरास पात्र आहेत, अपमानास नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वॉरेन आलेमाव यांनीही देशातील युवकांना 'वाळवी' संबोधणे हा त्यांचा अपमान असल्याचा आरोप करत सावईकर यांनी बिनशर्त माफी मागावी, असा इशारा दिला. सांताक्रूझ येथील समाजसेविका रोशेल फर्नांडिस यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "वाळवी" या शब्दाचा वापर स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीत सोमवारी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा लाभ घेऊन आपले राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी केला. हा प्रयत्न निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर यांनी दिली आहे.

आप गोवा युवा आघाडीने जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी विद्यार्थ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्याबद्दल विद्यार्थी आणि युवकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही पक्षाने केली. आप गोवा युवा आघाडीचे अध्यक्ष पूजन मालवणकर, उपाध्यक्ष कुतिन्हो, उत्तर गोवा युवा आघाडीच्या अध्यक्षा दुर्वा पेडणेकर उपस्थित होते.

वाळवीपेक्षा झुरळ धोकादायक

नरेंद्र सावईकर यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरत, माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी झुरळ हे वाळवीपेक्षा धोकादायक असते. कीटकशास्त्रात तसेच सांगितले आहे. झुरळामुळे रोगराई पसरते, वाळवीमुळे नाही.

त्यामुळे स्वतःला झुरळ म्हणून घेणाऱ्यांना वाळवी म्हटले म्हणून राग येण्याचे कारण नाही, असा दावा करत त्यांनी काँग्रेस नेत्यांनी कीटकशास्त्राचा अभ्यास करावा, अशी सूचना केली आहे.

नरेंद्र सावईकर यांना उपरती

वाढत्या वादानंतर सावईकर यांनी ती वादग्रस्त पोस्ट डिलीट करून आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्ट केले. ती पोस्ट केवळ घरातील झुरळे आणि वाळवी यांच्याविषयी होती.

घरात झुरळे किवा वाळवी असतील, तर त्यांची काळजी घेतली पाहिजे, एवढेच मला म्हणायचे होते. त्यात कोणी राजकारण शोधत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, अशी सारवासारव सावईकर यांनी केली आहे.

देशातील तरुणांचा अपमान : युरी आलेमाव

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप नेते नरेंद्र सावईकर यांच्या 'वाळवी' वक्तव्यावरून टीका केली आहे.

त्यांनी हा देशातील तरुणांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आलेमाव म्हणाले की, तरुण हे राष्ट्राचे भविष्य असून, शिक्षणविषयक मुद्द्यांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला आहे.

विद्यार्थ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न : विरियातो फर्नांडिस

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला, विशेषतः तरुण विद्यार्थ्यांना, प्रश्न विचारण्याचा आणि सरकारकडून उत्तर मागण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी दडपशाही करणे लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारे आहे.

गोव्यातील भाजप नेतृत्वाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केलेली विधानही दुर्दैवी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT