पणजी : पणजी महापालिकेच्या सर्व ३० जागा जिंकण्याचा सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा विश्वास गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पणजीचा भरीव विकास झालेला आहे आणि याच विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेले पॅनेल पणजी महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा विश्वास पणजीचे माजी आमदार व प्रदेश भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी भाजप व पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा पाठिंबा असलेल्या पॅनेलच्या सर्व ३० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज येथील उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी कार्यालयात दाखल केले.
यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, माजी महापौर उदय मडकईकर, शिवम चोडणकर, रूपेश हणणणकर, संजीव देसाई यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश होता. याप्रसंगी कुंकळ्येकर म्हणाले की, पणजीचा झालेला विकास लोकांच्या समोर आहे. त्यामुळे पणजीचे लोक निश्चितपणे भाजप समर्थक पॅनेलला मते देऊन पूर्ण बहुमत देतील.
रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात पणजी स्मार्ट सिटी म्हणून विकसित झाली. पणजीचे आमदार आणि आपले वडील बाबूश मोन्सेरात यांनीही पणजीच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे आमचे पॅनेल विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे मते मागणार असल्याचे मोन्सेरात यांनी सांगितले. माजी महापौर व उमेदवार उदय मडकईकर यांनी सांगितले की, महापालिकेत रोहित मोन्सेरात यांनी महापौर म्हणून त्यांच्या कार्यकाळात जे चांगले काम केले आहे, त्याची माहिती पणजीच्या लोकांना आहे; त्यामुळे या चांगल्या कामाचा मुद्दा लोकांसमोर घेऊन आम्ही प्रचंड बहुमत मिळवणार आहोत. उमेदवारी भरण्यापूर्वी सर्व उमेदवार व पाठिराख्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेतले. मंत्री बाबूश मोन्सेरात प्रकृती कारणास्तव यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत.
१) युतिका जांबवलीकर, २) कॅरोलिना पो, ३) मार्गारीटा फर्नाडिस, ४- रोहित मोन्सेरात, ५) किशोर शास्त्री, ६- वेंटो लोरेना, ७) संजीव देसाई, ८) करिना शिरोडकर, ९) कबीर पिंटो माखिजा , १०) प्रसाद आमोणकर, ११) तुकाराम चिनानवर, १२- वर्षा शेट्ये, १३) उदय मडकईकर, १४) प्रन्झोत वायंगणकर, १५) शायनी चोपडेकर, १६) अस्मिता केरकर, १७) डेनीस एडवर्ड जॉर्ज, १८- कृष्णा (मिलिंद) शिरोडकर, १९) ज्योती मोन्सेकर, २०) शुभम चोडणकर, २१) मनिशा नपेंरीकर, २२) दीक्षा माईणकर, २३) विद्या गडकर, २४) करण पारेख, २५) किर्ती सावळकर, २६) वसंत आगशीकर, २७) विठ्ठल चोपडेकर, २८) रुपेश हळणणकर, २९) सँड्रा डिकुन्हा, ३०) सिल्वेस्टर फर्नाडिस
महापौर रोहित मोन्सेरात यांना विरोधी पॅनेलबाबत विचारले असता, त्यांना आपल्या शुभेच्छा, असे ते म्हणाले. तर सुरेंद्र फुर्तादो यांना भाजप समर्थकांबद्दल विचारले असता आपल्या त्यांना शुभेच्छा असे फुर्तादो म्हणाले. मंत्री बाबूश मोन्सेरात आपले मित्र असल्याचेही फुर्तादो म्हणाले.
शुक्रवारी बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनेलच्या ३० उमेदवारांनी व प्रभाग क्र. ९ मध्ये आम्ही पणजीकर पॅनेलचे सुरेंद्र फुर्तादो यांनी अर्ज भरला. फुर्तादो हे गेली अनेक वर्षे सलग निवडून येत आहेत. त्यांचा सामना प्रभाग क्र. ९ चे भाजप समर्थक पॅनेलचे उमेदवार कबीर माखिजा पिंटो यांच्याशी होणार आहे.
आम्ही पणजीकरच्या उमेदवारांची लवकरच घोषणा : फुर्तादो
पणजी : पणजीचे माजी महापौर व अनेक वर्षे नगरसेवक असलेले सुरेंद्र फुर्तादो यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आपण आम्ही पणजीकर पॅनेलची सुरुवात म्हणून हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पॅनेलचे इतर उमेदवार लवकरच घोषित केले जातील. ते योग्यवेळी अर्ज भरणार आहेत, आपल्या पत्नीचा प्रभाग ओबीसी राखीव झाल्यामुळे त्या निवडणुकीत त्या उतरणार नाहीत. मात्र, आपला मुलगा या निवडणुकीत असेल, असेही त्यांनी सांगितले. आपण पणजीच्या ३० ही प्रभागांत लोकप्रिय असल्यामुळे आपण कुठेही उमेदवारी भरू शकतो आणि जिंकूनही येऊ शकतो, असे ते म्हणाले.