पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
अनेक राजकीय नेत्यांना निवडणुकीत एखाद्या बलाढ्य पक्षाची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा असते. मात्र, संबंधित पक्षाने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष म्हणून लढण्याचा पर्याय ते स्वीकारतात. मात्र आता त्याला त्यांनी 'जनतेचा उमेदवार' असे गोंडस नाव दिले आहे. बाणावलीतून चर्चिल आलेमाव आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी काँग्रेस आणि भाजपने अनुक्रमे उमेदवारी न दिल्यास 'जनतेचे उमेदवार' म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
चर्चिल आलेमाव हे काही काळासाठी गोव्याचे मुख्यमंत्री होते. बाणावली आणि नावेली मतदारसंघातून ते वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारीवर यापूर्वी निवडून आले आहेत. मात्र, २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा त्यांना बाणावलीतून काँग्रेसची उमेदवारी हवी आहे.
तसेच, कन्या वालंका आलेमाव यांना नावेली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. चर्चिल यांचे पुतणे वॉरेन आलेमाव यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बाणावलीतून काँग्रेस वॉरेन यांनाच उमेदवारी देईल, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना ५,१४० मते मिळाली होती. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आम आदमी पक्षाचे विजयी उमेदवार व्हेन्झी व्हिएगस यांना ६,४११ मते मिळाली होती.
चर्चिल यांना केवळ १,२७१ मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार आंतोनियो डायस यांना ४,६१९ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा काँग्रेसने उमेदवारी दिल्यास विजयाची संधी आहे असे चर्चिल आलेमाव यांना वाटते. त्यांची कन्या वालंका यांनीही २०२२ मध्ये काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
त्याही दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. भाजपचे विजयी उमेदवार उल्हास तुयेकर यांना ५,१६८ मते मिळाली होती. अवघ्या ४३० मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. त्यावेळेस नावेली मतदारसंघात काँग्रेस, आप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रत्येकी दोन हजारांहून अधिक मते मिळवली होती. यंदा ॲड. प्रतिमा कुतिन्हो या काँग्रेसच्या उमेदवारीच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
पेठणे मतदारसंघाचे माजी आमदार बाबू आजगावकर २०१७ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्रीपदही मिळवले. मात्र, २०२२ च्या निवडणुकीत त्यांना पेठणेऐवजी मडगावातून उमेदवारी दिली; मात्र तेथे काँग्रेसचे दिगंबर कामत विजयी झाले.
काँग्रेस उमेदवार कामत यांना १३,६६७, तर भाजपचे उमेदवार बाबू आजगावकर यांना ५,८८० मते मिळाली होती. आता आजगावकर पुन्हा एकदा पेठणेतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण 'जनतेचे उमेदवार' म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मगो, काँग्रेसने पक्षांतर केलेल्या नेत्यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट केले. आजगावकर यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागू शकते.
कुंकळ्ळी मतदारसंघातून एल्व्हिस गोम्स यांनीही आपण जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असे स्पष्ट केले आहे. त्यांचीही काँग्रेस उमेदवारीवर डोळा आहे. मात्र, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना डावलून काँग्रेस त्यांना उमेदवारी देणे शक्य नाही. त्यामुळे तेही जनतेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकतात.
साळगाव मतदारसंघातून भाजप यंदा आपल्यालाच उमेदवारी देईल, असे माजी पर्यटनमंत्री दिलीप परावकर वारंवार सांगत आहेत. विद्यमान भाजप आमदार केदार नाईक यांना तिकीट नाकारून परावकर यांना पक्षाची उमेदवारी मिळेल का हे पाहावे लागेल. मात्र त्यांनी आपण निवडणूक लढवणारच असे स्पष्ट केले आहे. खरे तर जनतेचा उमेदवार जनतेने जाहीर करायला हवा. जो निवडून येतो तो जनतेचा प्रतिनिधी असतो. त्यापूर्वी सर्वच जनतेचे उमेदवार स्वतःला म्हणून घेऊ शकतात.
पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे याने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत पोलिस कोठडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली.
दरम्यान, या प्रकरणात पीडित श्रीनिवास नायक यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. या गोळीबार प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा संशयित सतीश शिंदे यांनी केला होता.
आपल्याविरुद्ध इतर संशयितांनी दिलेल्या जबानीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत. त्याला मुंबईतून गोव्यात आणताना ट्रान्झिट वॉरंट घेण्यात आले नाही तसेच त्याला गोव्यात आणून अटक दाखवण्यात आली आहे. त्याला २४ तासांनंतर न्यायालयात उभे करण्यात आले. त्याच्या अटकेची माहिती रिमांडला नेण्यापूर्वी देण्यात आली त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा संशयिताने केला होता मात्र उच्च न्यायालयाने त्याचे हे मुद्दे फेटाळले.
पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिक परिसरात २८ ऑगस्ट रोजी श्रीनिवास नायक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी नायक यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर गुन्हे शाखेने तपास सुरू करून आतापर्यंत सतीश शिंदेसह आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींची भूमिका, गोळीबारामागील कारणांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.