पणजी : युद्धजन्य परिस्थिती व मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्याचा समाज माध्यमांवर फिरणारा संदेश बनावट आहे. तो अधिकृत संदेश असल्याचा खोटा दावा केला जात आहे, असा खुलासा गोवा पोलिसांनी मंगळवारी केला आहे.
बनावट व्हायरल संदेशात म्हटले आहे की, सीमेवर सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येकाने 50 हजार रुपये रोख स्वतःजवळ ठेवावे, वाहनांत इंधन भरून ठेवावे, किमान 2 महिन्यांची औषधे जवळ ठेवावीत, अन्न आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा साठा करावा, इन्व्हर्टर, बॅटरी यांचा बॅकअप ठेवावा, महत्वाचे दस्तावेज सुरक्षितपणे संग्रहित करून ठेवावे, आपत्कालीन संपर्क यादी, सुसज्ज प्रथमोपचार किट, टॉर्च, मेणबत्त्या आणि चार्ज केलेल्या पॉवर बँका, मूलभूत साधने (चाकू, टेप, दोरी इ.), कपडे आणि ब्लँकेटसह आपत्कालीन बॅग, तुमचे फोन नेहमी चार्ज ठेवावे अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी ही व्हायरल संदेशामधून दिली गेलेली माहिती खोटी, दिशाभूल करणारी आणि अनावश्यक दहशत पसरवण्याच्या उद्देशाने समाजकंटकांनी पोस्ट केल्याचा खुलासा केला आहे.
बनावट संदेश पसरवणे किंवा फॉरवर्ड करणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना शांत राहण्याचे, तथ्य पडताळण्याचे आणि अचूक अपडेटसाठी गोवा पोलिसांच्या अधिकृत चॅनेलवर अवलंबून राहण्याचे आवाहन केल्याचे म्हटले आहे.