पणजी पुढारी वृत्तसेवा :
कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांनी एका आयएएस अधिकाऱ्याच्या वाहनाची तपासणी केल्याने त्यांना पोलिस अधीक्षकांकडून उठाबशा काढण्याची शिक्षा करत अपमान करण्यात आला. ही कृती म्हणजे त्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. त्या कृतीचा पोलिस वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.
एका आयएएस अधिकाऱ्याच्या दडपणाखाली पोलिस अधीक्षकांनी घेतलेल्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात सुरू असलेल्या दरोडे, चोऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी नाकाबंदी सुरू आहे.
जुने गोवे पोलिस स्थानकाचे पोलिस कर्मचारी नाकाबंदीसाठी सांताक्रुझ येथे तैनात करण्यात आले होते. बीआर नोंदणी असलेली गाडी रात्रीच्यावेळी या पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवली व चालक परवान्याची मागणी केली.
गाडीचा चालक खुद्द आयएएस अधिकारी असल्याचे ओळखपत्र त्याने दाखविले तरी गाडी तपासणीची प्रक्रिया सुरूच ठेवल्याने या आयएएस अधिकाऱ्याचा अपमान झाला. पोलिसांनी त्याला विशेष वागणून न दिल्याने त्याला राग आला व त्याने सरळ उत्तर गोवा पोलिस अधीक्षकाना फोन लावला व एकंदरीत घटनेची माहिती दिली.
अधीक्षकांनी या पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले व त्यांच्या कर्तव्यात कोणतीही चूक नसताना किंवा कोणतीही गैरवर्तणूक केली नसताना त्यांना उठाबशा काढण्यास भाग पाडले. कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची गळचेपी करण्यात आल्याबद्दल पोलिसांमध्येही नाराजी पसरली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी अधीक्षकांचा निर्णय अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. शिस्तीच्या नावाखाली कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा असा अपमान करणे चुकीचे आहे.
पोलिसांच्या कर्तव्यात जर चुका नसतील तर कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत