पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील किनारी भागातील पोलिस स्थानकांसोबतच इतर पोलिस स्थानकातील पोलिसांना गस्त घालण्यास सोयीचे व्हावे यासाठी जादा दुचाकी उपलब्ध केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेमधे दिले.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी शून्य प्रहराला राज्यात वाढलेल्या चोऱ्या आणि गुन्हेगारी कृत्यावर चिंता व्यक्त करून पोलिस स्थानकांना दुचाकी नसल्याने गस्तीवर परिणाम झाल्याचे सांगितले होते. देवस्थान व चर्चच्या दानपेटी फोडणे, गळ्यातील सोन्याचे दागीने खेचने अशा प्रकारचे गुन्हे वाढलेले आहेत.
नियोजन करून चोऱ्या केल्या जात आहेत पोलिस स्थानकामध्ये एखाद-दुसरी दुचाकी असल्यामुळे इतर पोलिस पोलिस स्थानकामध्ये बसून राहतात त्यांना गस्तीवर जाण्यासाठी जादा दुचाकी उपलब्ध करा, अशी मागणी लोबो यांनी केली. उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांत सर्वच पोलिस स्थानकांना दुचाकी उपलब्ध केल्या जातील आणि पोलिस त्यांच्या माध्यमातून गस्त वाढवतील असे सांगितले.
बीच क्लिनिंग अॅपवर तक्रारी करा
पर्यटन खात्याने बीच क्लिनिंग अॅप जारी केले आहे. त्या अॅपवर किनाऱ्यावर कचरा वा इतर काही अडचणी असतील तर फोटो पाठवल्यास दोन तासांमध्ये कचरा साफ केला जातो. किंवा इतर प्रकरणावर कारवाई केली जाते, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी किनारे स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला व हणजूण व वागातोर किनाऱ्यावर अपुरे सफाई कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यावर खंवटे यांनी कंत्राटदाराकडील काही कर्मचाऱ्यांनी अचानक काम सोडल्याने ही समस्या उदभावल्याचे सांगून जादा कर्मचारी नेमण्यास सांगणार असल्याचे म्हटले.