Cyber Crime pudhari photo
गोवा

Goa Police Cyber Vigil 2.0 arrests | गोवा पोलिसांकडून सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश

सोळा राज्यांतून २४ संशयित अटकेत, 'सायबर व्हिजिल २.०' मोहिमेत ३७ गुन्ह्यांची उकल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सायबर गुन्हेगारीविरोधात गोवा पोलिसांनी मोठी आंतरराज्य मोहीम राबवत २४ संशयित आरोपींना अटक केली. 'सायबर व्हिजिल २.०' या विशेष मोहिमेंतर्गत देशातील १६ राज्यांमध्ये ४३ पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. या कारवाईत ३७ सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, तब्बल ८ कोटी २१ लाख ६७ हजार ९९९ रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा तपास पुढे आला आहे. याशिवाय २० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

उत्तर व दक्षिण गोवा पोलिस आणि सायबर क्राईम पोलिस स्थानकाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत आयुष आणि सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. गोव्याबाहेर राहून सायबर गुन्हे करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने २०२६ मध्ये आतापर्यंत सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. संशयित फसवणूक खात्यांमध्ये तब्बल १५.९४ कोटी रुपये लियन मार्किंगद्वारे सुरक्षित करण्यात आले आहेत. याशिवाय १,७१७ सिमकार्ड, ७२२ सोशल मीडिया हँडल्स आणि ८१४ बनावट वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा

गोवा पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवले असून, अशा गुन्ह्यांत सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. ही संपूर्ण मोहीम गुन्हे व परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या यांच्या देखरेखीखाली, पोलिस महानिरीक्षक केशव राम चौरसिया आणि पोलिस महासंचालक अलोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. कोणालाही ओटीपी, पिन किंवा बँकिंग तपशील देऊ नयेत, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

३०६ झिरो ई-एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतर करण्यात आले. तक्रार निवारण यंत्रणेद्वारे ६४४ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, एमआरएम पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील पीडितांना १ कोटी ९४ लाख ३३ हजार ६८२ रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT