उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या कथित आरोपाप्रकरणी निलंबित पोलिस कॉन्स्टेबल गौरेश नाईक याच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीत लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) सुमारे ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
गोवा दक्षता संचालनालच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गौरेश नाईक हे वाळपई येथील रहिवासी असून, त्यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी एसीबीकडून तपास केला जात आहे. गेल्या शुक्रवारी एसीबीने टाकलेल्या छाप्यादरम्यान तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे एसीबीच्या दुसऱ्या पथकाने आणखी एका घराचा शोध घेतला. या ठिकाणी पोलिस कॉन्स्टेबलशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे सोन्याचे दागिने आढळून आले. त्यांचे एकूण वजन जवळपास ८०० ग्रॅम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या या सोन्याच्या दागिन्यांची किंमत तसेच त्यांची खरेदी कधी आणि कोणत्या माध्यमातून करण्यात आली, याबाबतचा तपास एसीबीकडून केला जात आहे.
या प्रकरणातील जप्ती आणि पुढील तपासाच्या आधारे नाईक यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळलेली मालमत्ता आणि मौल्यवान वस्तू किती प्रमाणात अधिक आहेत, याची पडताळणी केली जाणार आहे.
अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
निलंबित पोलिस कॉन्स्टेबल गौरेश नाईक याने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयाने पुढील सात दिवसांसाठी त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, कॉन्स्टेबलला दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या (एसीबी) कार्यालयात हजेरी लावून अहवाल द्यावा लागणार आहे.