पणजी : करमळी येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा सायबर विभागाने पर्दाफाश केला. सायबर पोलिसांच्या एका पथकाने करमळीमधील एका भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकला आणि ७ जणांना अटक केली. तसेच त्यांच्या ताब्यातून अंदाजे २३ लाख रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल वस्तू जप्त केल्या. ही कारवाई १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री २३.३० ते १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत या दरम्यान करण्यात आली.
यावेळी जय विजय आचार्य, (रा. मालाड पूर्व, मुंबई) योगेश सोहनलाल माळी, (रा. अहमदाबाद, गुजरात) ऋषभ दीपककुमार शाह, (रा. गांधीनगर, गुजरात) आशुतोष योगेश प्रताप, (रा. अहमदाबाद, गुजरात) ठक्कर पार्थ भारभाई, (रा. अहमदाबाद शहर, गुजरात), एड्रियन किन्स्टन मारियासेवान (रा. मुंबई) आणि निलेश सतीश सिंग (रा. हनुमान मंदिर जवळ, नागपूर, महाराष्ट्र) या ७ जणांना अटक केली.
हे सर्वजण पेडे या नावाने कर्ज कंपनीचे एजंट असल्याचे भासवून, कर्ज आणि त्वरित पैसे देण्याच्या खोट्या बहाण्याने अमेरिकेच्या निष्पाप नागरिकांना गिफ्ट कार्ड्सच्या (सेफोरा, मेसीज, ग्रीन डॉट मनी पॅक, ॲपल गिफ्ट कार्ड, रेझर गोल्ड आणि एक्सबॉक्स) स्वरूपात मोठी रक्कम भरण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करत होते. सायबरचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.