पणजी : पुढारी वृत्तसेवा
पेट्रोलच्या किमती वाढण्याबाबत निर्णय आपल्या हातात नसल्याचे स्पष्ट करत, गेल्या दीड वर्षांपासून देशात पेट्रोलचे दर स्थिर असल्याची माहिती गोवा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिली आहे. राज्यात पेट्रोल तसेच डिझेलचा कोणताही तुटवडा नसून, सध्या १५ दिवसांचा साठा उपलब्ध असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले.
असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगला देश यांसारख्या शेजारील देशांमध्ये इंधन तुटवडा आणि मोठ्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे.
मात्र, त्या तुलनेत गोव्याची परिस्थिती अधिक स्थिर आणि समाधानकारक असल्याचा दावा असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी केला. यावेळी सचिव सुनील मोरजकर, उपाध्यक्ष पद्मा कामत, सिद्धेश कवळेकर, अमरेश नाईक व गौरीश धोंड उपस्थित होते. गोव्यात पेट्रोलचा तसा कोणताही तुटवडा नाही.
आमच्याकडे सध्या १५ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. तसेच पुरवठा पुन्हा भरण्यासाठी दर आठवड्याला जहाजे येतात. या नियमित पुरवठा व्यवस्थेमुळे राज्यात इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांनी उगाच पेट्रोल व डिझेलचा साठा करू नये, असे आवाहन गोवा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने म्हटले आहे.
पेट्रोल भरण्यावरून ग्राहकांमध्ये गैरसमज
पेट्रोल पंपावरील कर्मचारी व ग्राहक यांच्याच पेट्रोल भरण्याच्या गैरसमजुतीमुळे खटके उडतात. टाकीच्या क्षमतेची माहिती दिलेल्यापेक्षा ती काहीशी मोठी असते. जर एखादी तक्रार असल्यास ग्राहकांनी कार्यालयात किंवा मालकाशी संपर्क साधावा. त्यासाठी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा वाद घालणे हा उपाय नाही, असे अध्यक्ष नरहर ठाकूर म्हाणाले.