पेडणे - तालुक्यातील तुये आरोग्य व संशोधन केंद्र (जीएमसी लिंक्ड) येथे अद्यापही अनेक महत्त्वाच्या सुविधा अपूर्ण असल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रलंबित कामांवर तातडीने कार्यवाही करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी तुये हॉस्पिटल कृती समितीने राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडे केली आहे.
कृती समितीचे संयोजक जोस लोबो यांनी आरोग्य सेवा विभागाच्या संयुक्त सचिवांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात रुग्णालयातील विविध त्रुटी आणि अपूर्ण कामांकडे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील गॅस पाईपलाईनचे मुख्य काम पूर्ण झाले असले, तरी अंतिम चाचणी, फिनिशिंग आणि कार्यान्वयन अद्याप बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यास रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊ शकेल.
ऑपरेशन थिएटरचे कामही संथ गतीने सुरू असून, सध्याच्या वेगाने ते पूर्ण होण्यासाठी आणखी चार ते पाच महिने लागू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रिया विभाग लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची मागणी समितीने केली आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जुनी पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून ती सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बनली आहे. दोन महिन्यांपूर्वी आमदारांच्या भेटीदरम्यान एका महिन्यात ही टाकी हटविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने ती तातडीने हटविण्याची मागणी समितीने केली आहे.
पेडणे तालुक्यातील नागरिकांना पूर्ण क्षमतेने कार्यरत, आधुनिक आणि कार्यक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आवाहन संयोजक जोस लोबो यांनी केले.
पोलिस चौकीही नाही
रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी अथवा पोलिस मदत कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.
औषधे घ्यावी लागतात बाहेरुन...
जीएमसी डॉक्टरांनी लिहून दिलेली अनेक औषधे रुग्णालयातील औषध वितरण केंद्रात उपलब्ध नसल्याने रुग्णांना ती बाहेरून खरेदी करावी लागत आहेत. आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा करण्यासाठी जीएमसी फार्मसीशी प्रभावी समन्वय साधावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नियुक्त डॉक्टरांची अनियमित सेवा...
जीएमसीकडून नियुक्त डॉक्टर नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी जीएमसी प्रशासनाने समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे