Congress  Pudhari
गोवा

Goa Assembly Election | गोव्यात विरोधकांच्या युतीची चर्चा जोरात, जागावाटपावरून काँग्रेससमोर नवे आव्हान

Goa Assembly Election | गोवा फॉरवर्ड, आरजी पक्षांची भूमिका; काँग्रेसच्या निर्णयाकडे लागले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशन गोवन्स (आरजी) या तीन पक्षांची युती आकार घेत आहे. या पक्षांमध्ये युती संदर्भात चर्चेची बोलणी सुरू झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड आणि आरजीकडून जि. पं. निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर जागांची मागणी होत आहे. त्यावर काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

आम आदमी पक्षाने विरोधी पक्षांच्या युतीमध्ये यावे, असे आवाहन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई हे वारंवार करत आहेत, मात्र, काँग्रेस आणि भाजप वगळून विरोधकांची युती व्हावी, असे पालुपद आपने सुरू ठेवले आहे. त्यामुळे आप या विरोधी पक्षांच्या युतीमध्ये सहभागी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या युतीची प्राथमिक चर्चा सुरू आहे. त्यामध्ये गोवा फॉरवर्ड आणि आरजी पक्षाने विधानसभेनंतर जि. पं. निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना जेथे जेथे जास्त मते मिळाली होती, तो मतदारसंघ आपणास मिळावा, अशी मागणी केल्याचे समोर आले आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत ५० पैकी काँग्रेसला १०, गोवा फॉरवर्डला १, आरजीला २ जागा मिळाल्या होत्या. अपक्षांना ४, मगोला ३, आपला १ व भाजपला २९ जागा मिळाल्या होत्या. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची सत्ता आली होती.

गोवा फॉरवर्ड व आरजी पक्षाने अनुक्रमे जिंकलेल्या १ व २ मतदारसंघांसह ज्या मतदारंसघात भाजप जिंकला व आरजी किंवा गोवा फॉरवर्ड दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते, त्या मतदारसंघांची मागणी केली आहे. आरजी पक्षाने सुरुवातीला १६ जागा व नंतर १२ जागांची मागणी केली होती, तर गोवा फॉरवर्डने ६ जागांचा आग्रह धरलेला आहे.

दुसरीकडे प्रत्येकी एक आमदार असलेल्या या पक्षांनी मागितलेल्या जागा जादा असल्याचे मत काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत. दोन्ही पक्षांना कमीत कमी जागा देऊन जास्तीत जास्त जागा काँग्रेस लढवू इच्छित आहे.

जिल्हा पंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत फारसा फरक नसला तरी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदारांची संख्या तुलनेने कमी असते. विधानसभेच्या दोन मतदारसंघांची विभागणी करून जिल्हा पंचायतीचे तीन मतदारसंघ बनवले आहेत. पालिका क्षेत्रातील मतदार जि.पं. मतदान करत नाहीत.

सांताक्रूझ व सांत आंद्रे 'आरजी'ला हवेत

सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघातील सांताक्रूझ व सांत आंद्रे मतदारसंघातील सेंट लॉरेन्स या दोन जि. पं. जागा आरजी पक्षाने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे आरजी हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ मागत आहे. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले असल्याने काँग्रेस तूर्तास तयार नसल्याची माहिती मिळाली आहे.

या दोन मतदारसंघांसह शिरोडा, बोरी व कवळे या भाजपने २ व मगोने १ जिंकलेल्या जि. पं. मध्ये आरजी दुसऱ्या क्रमांकावर असल्याने शिरोडा व मडकई मतदारसंघ आरजी मागत आहे. तसेच शिवोली, होंडा जि. पं. मध्ये आरजी दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे पर्ये व वाळपईवर आरजी दावा करत आहे.

20 आमदारांचे काँग्रेसचे लक्ष्य

स्वबळावर २० आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. कारण काँग्रेसचे १५ पेक्षा कमी आमदार निवडून आले, तर पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडण्याची भीती काँग्रेस नेतृत्वाला आहे. त्यामुळे किमान २० आमदार निवडून यायला हवेत. त्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवून जिंकणे, याच ईर्षेने काँग्रेस निवडणुकीत उतरणार असल्याचे कळते.

गोवा फॉरवर्डचा सांगेसह काणकोणवर दावा

जि. पं. निवडणुकीत गोवा फॉरवर्डने नुवे विधानसभा क्षेत्रातील राय जि. पं. मध्ये विजय मिळविला. भाजपने जिंकलेल्या सांगेतील रिवण, काणकोणमधील पैंगिण, मांद्रेतील मोरजी, पेडणेतील धागरळ व मयेतील चोडण या जि. पं. मतदारसंघांत गोवा फॉरवर्ड दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे हे मतदारसंघही गोवा फॉरवर्ड मागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT