पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोव्हिड-१९ महामारीच्या काळात संपर्कविरहित, जलद आणि प्रभावी शासकीय सेवांची गरज प्रकर्षाने जाणवली. कोव्हिडपूर्वीही गोवा ऑनलाईन कार्यरत होते. मात्र, महामारीमुळे या प्रणालीचा वापर झपाट्याने वाढला आणि ती गोव्याची डिजिटल जीवनवाहिनी ठरली. ई गव्हर्नन्स उपक्रम म्हणून गोवा ऑनलाईन नागरिकांना कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून शासकीय सेवा मिळवण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देते.
अर्ज करण्यापासून ते सेवा मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे १९.९ लाख सेवा अर्जावर प्रक्रिया करण्यात आली असून, नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी गोवा ऑनलाईन एक राष्ट्रीय आदर्श ठरले आहे.
या पोर्टलवर उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, कामगार कल्याण योजनांची नोंदणी, आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) अशा अनेक अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. सध्या गोवा ऑनलाईनवर ४१ शासकीय विभागांतील २६५ हून अधिक ई-सेवा उपलब्ध असून, ९ लाखांहून अधिक नागरिकांनी ११ लाखांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहार करून या सेवांचा लाभ घेतला आहे.
ग्रामीण भागातही सर्वसमावेशक सेवा पोहोचाव्यात यासाठी शासनाने ग्रामीण मित्र नेमले आहेत, जे घरोघरी जाऊन सेवा मिळवून देतात. या प्लॅटफॉर्मला विविध विभागांतील एकात्मिक बॅकएंड प्रणालींचा आधार असून, त्यामुळे कामाची पुनरावृत्ती टळते, प्रक्रिया जलद होते आणि सेवेची अचूकता वाढते. अर्जदारांना आपल्या अर्जाची स्थिती प्रत्यक्ष वेळेत पाहता येते.
माहिती तंत्रज्ञान विभाग कार्यरत
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा सुरू आहेत. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन विभाग (डीआयटीईएण्डसी) या पोर्टलला मोबाईल-फर्स्ट बनवण्यावर काम करत असून, चॅटबॉट सहाय्य आणि एआय आधारित सुविधा विकसित केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य सेवा सहज मिळतील आणि डिजिटल समावेशन अधिक व्यापक होईल.
'गोवा ऑनलाईन हे केवळ एक पोर्टल नाही, तर कार्यक्षम प्रशासनाचे आश्वासन आहे, जिथे तंत्रज्ञान नागरिक आणि शासन यांच्यातील अंतर दूर करते.'- रोहन खंवटे, मंत्री आयटी खाते
'मला चालता येत नाही, त्यामुळे कार्यालयात जाणे शक्य नव्हते. ग्रामीण मित्रांच्या मदतीने टीम घरी आली आणि माझे जीवन प्रमाणपत्र काढून दिले. अनुभव खूप चांगला होता आणि मला खरोखरच आधार मिळाला.' शीतल मळीक, ज्येष्ठ नागरिक, साखळी.