gautam khattar  
गोवा

Goa Off the Record | ऑफ द रेकॉर्ड...तुम्हाला जास्त काळजी दिसते...!

Goa Off the Record | ऑफ द रेकॉर्ड...तुम्हाला जास्त काळजी दिसते...!

पुढारी वृत्तसेवा

भाषण लिहून देणारा आणि बोलणाराही अटकेत

गोव्यात येऊन वादग्रस्त भाषण करणारे गौतम खट्टर यांचा भाऊ माधव खट्टर याला गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून गोव्यात आणले आहे. माधव खट्टर यांनी गौतम खट्टरला वादग्रस्त भाषण लिहून दिल्याचा दावा पोलिस करत आहेत. आता कुलू हिमाचलमध्ये पोलिसांनी गौतम खट्टर याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे लवकरच तो गोवा पोलिसांच्या ताब्यात असेल. आता अखेर एफआयआरचे सत्र थांबेल.

तुम्हाला जास्त काळजी दिसते...

सद्यस्थितीत प्रत्येक कार्यक्रमानंतर काही पत्रकार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करणार?, रिक्त जागा कधी भरणार?, महिलांना मंत्रिमंडळी घेणार का? असे प्रश्न वारंवार विचारतात. तुमच्याकडे जास्त खाती आहेत ती तुम्हाला सांभाळणे जड जात नाही का? असेही विचारतात. त्यावर हजरजबाबी असलेले डॉ. सावंत तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराची जास्त काळजी दिसते. माझ्याकडील खात्यासह अतिरिक्त खात्यांचा कारभार पाहायला मी समर्थ आहे, असेही ते सांगतात. महिलेला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे झाल्यास ते डिलायला लोबो यांना द्यावे लागेल, कारण इतर दोन महिला आमदारांचे पती मंत्री आहेत. याची जाणीव मुख्यमंत्र्यांनाही असावी.

काँग्रेस प्रतिनिधीकडे उत्तर नव्हते

एका वृत्तवाहिनीवर बुधवारी एक चर्चासत्र ठेवण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे युवा नेते अर्चित नाईक आणि हिंदू जनजागृती समितीचे गोवा प्रभारी मनोज सोळंकी सहभागी झाले होते. यावेळी अँकरने हिंदू जनजागृती समिती काँग्रेसच्या विरोधात प्रचार का करते? असा प्रश्न विचारला, त्याला उत्तर देताना सोळंकी यांनी स्पष्टपणे सांगितले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते हिंदू आणि सनातन धर्म संपवण्याची भाषा करतात. नेहमीच हिंदू देव-देवतांवर टीका करतात. त्यांनी राममंदिराला विरोध केला. हिंदू देवतांवर नको ती टीका केली गेली किंवा एखाद्या हिंदू नागरिकांवर अत्याचार झाला तर काँग्रेस कधीही त्या घटनेचा निषेध करत नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना या नात्याने काँग्रेसला आम्ही विरोध करतो, सोळंकी यांच्या या युक्तिवादावर काँग्रेस प्रतिनिधीकडे उत्तर नव्हते.

सरकारचा अध्यादेश आणि अधिवेशन

पालिका, पंचायत निवडणुका घेण्याचा अधिकार अध्यादेशाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला प्रदान करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यातील मुख्य प्रश्न असा आहे की, निवडणूक आचारसंहितेमुळे विधानसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर प्रलंबित राहिलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या विषयांवर चर्चा करण्यासाठी, मुख्यमंत्री पुन्हा विधानसभा अधिवेशन बोलावणार नाहीत का? विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी यापूर्वीच राज्यपालांकडे निवेदन सादर करून, विधानसभा पुन्हा बोलावण्याची मागणी केली होती. राजकीय निरीक्षकांच्या मते, सरकारचा नजीकच्या भविष्यात अधिवेशन बोलावण्याचा विचार असता, तर निवडणूक आयोगाला अधिकार देण्यासाठी गोवा नगरपालिका कायद्यात सुधारणा करण्याकरिता त्यांनी अध्यादेशाचा मार्ग स्वीकारला नसता.

अफवा अशीही...

गोव्यात जे लोक १५ वर्षपिक्षा जास्त काळ वास्तव्यास नाहीत त्यांच्या जमिनी व घरे जप्त केली जातील, अशा आशयाची ब्रेकिंग न्यूज समाज माध्यमातून फिरत आहे. सरकारने या गोष्टीचा इन्कार केला आहे. तरी लोक अफवेवर विश्वास ठेवून सरकारवर कडक शब्दांत टीका करत आहेत. काहींनी हा उद्योग खासगीरीत्या चालवलेलाच आहे. अनेक लोकांना गोव्याला भेट दिल्यानंतर आपली घरे आपली राहिलीच नसल्याचे लक्षात येते. लोकांना वाटते की खासगी लोक करतात तर सरकारनेच त्याला संस्थात्मक रूप द्यायचे ठरवले असेल तर?

आता सांताक्रुझवासीयही अस्वस्थ !

राज्यात गौतम खट्टर प्रकरण चांगलेच तापले असून आता सांताक्रुझवासीयही अस्वस्थ झाले आहेत. गौतम खट्टर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आपण आंदोलन करू, असा थेट इशारा स्थानिकांनी दिला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव असून खट्टर यांच्या वक्तव्याने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. काहीच कारण नसताना राज्यातील धार्मिक, सामाजिक सलोखा बिघडला असून आता राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेवरील भार चांगलाच वाढला आहे. आता खट्टर कुठे लपून बसलेत, हे लवकरच समोर येईल.

ट्रॉलर्स पळवले की न सांगता नेले

गोव्याच्या समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारे ट्रॉलर्स बुधवारी पकडण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित असताना त्यातील काही ट्रॉलर्स संबंधितांना पळवले. हा पळवून नेणाऱ्यांनी केलेला जसा गुन्हा आहे, तसाच त्या ट्रॉलर्सच्या सुरक्षिततेची, देखरेखीची काळजी न घेणाऱ्या मत्स्यखात्याचा हलगर्जीपणही आहे. मात्र, मत्स्यखात्याच्या संचालकांनी खात्याच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी केलेली मखलाशी चर्चेचा आणि हास्याचा विषय ठरली. संचालकांनी सारवासारव करताना म्हटले की, ट्रॉलर्स पळवून नेले नाहीत, तर खात्याला न सांगता नेले आहेत. पळवून नेणे आणि पूर्वकल्पना न देता नेणे या वाक्यांचा वेगवेगळा अर्थ नाही, हे कुणीतरी मत्स्यखात्याला सांगण्याची गरज आहे, असे अनेकजण सांगतात आणि यामागे काही गौडबंगाल तर नाही ना, अशी शंका उपस्थित करीत आहेत.

मंत्र्यांची बोलती बंद

गोवा हे पर्यटन स्थळ असण्याबरोबरच शांततामय राज्य आहे. त्यामुळेच तर काही नेते या राज्याची पार्श्वभूमी माहीत नसताना बेताल वक्तव्ये करून राज्याची शांतता बिघडवत आहेत. हल्लीच खट्टर यांनी केलेल्या विधानाबद्दल राज्यात रोष आहे; पण ही घटना या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका मंत्र्यांच्या उपस्थितीत घडली. त्यामुळे ती आणखी गंभीर आहे. तेव्हाच त्यांनी आवर घालण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी काहीच केले नाही. तेथे कायदा व सुव्यवस्था उपस्थित होईल हे कारण पटण्यासारखे नाही. मात्र, या मंत्र्याने अधिक स्पष्टीकरण देण्यापेक्षा गप्प राहणे पसंत केले आहे.

जेलरला वाचवण्याचा प्रयत्न

कोलवाळ कारागृहातील जेलरने सरकारी नोकरभरती घोटाळ्यातील संशयित पूजा नाईक हिला कोणतीही शहानिशा न करता घरी जाण्यास परवानगी दिली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेर तुरुंग महानिरीक्षकांनी त्यात लक्ष घातल्याने त्याची चौकशी सुरू झाली. ही चौकशी म्हणजे सध्या तरी फार्स असून तुरुंग अधीक्षकासह ड्युटीवर असलेले इतर तुरुंग अधिकारीही जबाबदार आहेत. हे प्रकरण सगळ्यांनाच महागात पडण्याची शक्यता असल्याने ते मिटवण्याची धडपड सुरू झाली आहे. हे कारागृह वादग्रस्त बनत चालले आहे. अनेक कारवाया सुरू असतात. मात्र, त्या चार भिंतीच्या बाहेर पडू नयेत, म्हणून सर्वजण एकमेकाला सामील असतात हे दिसून येते.

पालिका निवडणुका नेमक्या कधी?

राज्य निवडणूक आयोगाला अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या अध्यादेशावर राजकीय क्षेत्रातील सर्व घटकांचे बारकाईने लक्ष आहे. अनेकांचे असे मानणे आहे की, पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आयोगाला किती कालावधी लागेल, याचे संकेत या दस्तऐवजातून मिळू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाला अनुसरावी लागणारी एक सविस्तर कार्यपद्धती या अध्यादेशात नमूद केलेली असू शकते. तरीही, एक अनुत्तरित प्रश्न कायम आहेः नगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर होण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला नेमका किती वेळ लागेल? याचे उत्तर कदाचित पुढील आठवड्यातच अधिक स्पष्ट होऊ शकेल.

तेव्हा गळा काढणारे आता कुठे गेले?

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात गौतम खट्टर याने वादग्रस्त विधान केल्यावर सर्व पक्षातील राजकीय पदाधिकारी, अनेक संघटना खट्टरसह संबंधित मंत्री आणि आयोजकांच्या विरोधात उभे राहिले. मंत्र्यांना पदावरून हटवा, आयोजकांवर गुन्हे दाखल करा, खट्टरला अटक करा अशी मागणी करीत होते व आहेत. आता खट्टर सारख्याच काहींनी हिंदू देव देवतांबद्दल वादग्रस्त विधान केले तेव्हा काही हिंद व हिंद संघटना वगळता कुणी त्या वक्तव्याचा, त्या पोस्टचा विरोध करताना दिसले नाहीत. तेव्हा त्यांची तोंडे कोण धरतो?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आरोग्यमंत्री यांचा इशारा आणि चर्चा

आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे बोलता बोलता अनेक गोष्टी बोलून जातात. वाळपई येथे गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आपण मुख्यमंत्र्यासोबत आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी सत्तरीच्या युवक-युवतींना नोकऱ्या द्याव्यात, असे विधान केले. त्यावरून ते भाजपात असूनही आपल्या नेत्याला इशारा देतात. एक मंत्री आपल्या मुख्यमंत्र्यांना असा इशारा देऊ शकतो का? शिवाय मुख्यमंत्री सत्तरीतील लोकांना नोकऱ्या देत नाहीत असाही होतो. सध्या सोशल मीडियावर याची जोरात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT