Hospital Pudhari
गोवा

Goa Hospital news: तुये हॉस्पिटल जीएमसीला लिंक न केल्यास आमरण उपोषण

कृती समितीचा इशारा : सरकारला २७ जानेवारीपर्यंत मुदत

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : तुये येथील नव्या हॉस्पिटल इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधाऐवजी केवळ सध्याच्या सामुदायिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्याचा घाट सरकारने घातल्यास तो हाणून पाडला जाईल. तुये हॉस्पिटल गोमेकॉला लिंक न केल्यास कृती समितीतर्फे २८ पासून आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा कृती समितीने पत्रकार परिषदेत दिला आहे.

पार्से येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेस तुये हॉस्पिटल कृती समितीचे निमंत्रक जुझे लोबो, समन्वय समितीचे सदस्य अॅड. प्रसाद शहापूरकर, देवेंद्र प्रभुदेसाई, व्यंकटेश नाईक, तुळशीदास राऊत, भास्कर नारुलकर, अॅड. जितेंद्र गावकर, नीलेश कांदोळकर, सत्यवान वराडकर आदी उपस्थित होते.

लोबो आणि अॅड. शहापूरकर म्हणाले की, इस्पितळाच्या इमारतीचे काम २०१७ मध्ये पूर्ण होऊनही जीएमसी लिंक हॉस्पिटल सुरू झालेले नाही. अलीकडेच विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी ३० जानेवारी रोजी उद्घाटनाचे संकेत दिले आहेत. मात्र, नव्या उपकरणांच्या निविदा आणि कर्मचारी भरतीसाठी किमान ४-५ महिने लागणार असताना १० दिवसांत हॉस्पिटल सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ घाईगडबडीत जुन्या केंद्राचे स्थलांतर करून पेडणेकरांच्या डोळ्यांत धूळ फेकू नये, अशी मागणी समितीने केली आहे. नव्या इमारतीत गायनॅकॉलॉजी, पेडियाट्रिक आणि कार्डिओलॉजी यांसारखे स्पेशल वॉर्ड सुरू व्हावेत, असा आग्रह समितीने धरला आहे.

सरकारने चर्चेला यावे...

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कृती समितीला विश्वासात घेऊन चर्चा करावी. अत्याधुनिक सोयीसुविधा आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध केल्याशिवाय उद्घाटन करू नये. जर सरकारने अट्टहास धरला, तर होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार राहील, असे देवेंद्र प्रभुदेसाई व इतर सदस्यांनी यावेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT