Traffic Rules file photo
गोवा

Traffic Rules : गोवा राज्यात १ जुलैपासून वाहतूक दंडाची रक्कम वाढणार

वाहन चालवताना फोन वापरल्यास, आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १० हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यात ३० जून रोजीच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १ जुलैपासून वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी मोठा दंड भरावा लागणार आहे. उल्लंघनाची इलेक्ट्रॉनिक अंमलबजावणी सुरू होणार असून, परिवहन संचालनालयाने इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) द्वारे लागू होणाऱ्या दंडांची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांसाठीच्या दंडात मोठी वाढ करण्यात आली आहे.

वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी १,००० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी १०,००० रुपये दंड आकारला जाईल, तर रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १०,००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच धोकादायक ड्रायव्हिंगसाठीही पहिल्या गुन्ह्यासाठी १,००० व नंतर १०,००० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे १ जुलैपासून आता चालकांनी वाहतूक नियमभंग होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १३६-अ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक अंमलबजावणी, राज्यभरातील प्रमुख चौकांमध्ये बसवलेल्या एआय-सक्षम वाहतूक निगराणी कॅमेऱ्यांमार्फत केली जाईल. प्रणालीद्वारे आढळलेल्या उल्लंघनांसाठी आपोआप चलन आणि अधिसूचना तयार केल्या जातील. वाहन मालकांना त्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उल्लंघनाच्या सूचना मिळण्याची खात्री करण्यासाठी, त्यांची वाहने परिवहन पोर्टलवर किंवा संबंधित नोंदणी प्राधिकरणांकडे जोडलेली असावीत.

संचालनालयाने म्हटले आहे की, रस्ते सुरक्षेवर सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने दिलेल्या निर्देशांनुसार, लाल सिग्नल तोडणे, अति वेगाने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे, मालवाहू वाहनांवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकणे आणि मद्यपान करून वाहन चालवणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे देखील किमान तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाहन चालवण्याचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. राज्यभरातील २६ चौकांमध्ये इलेक्ट्रॉनिक अंमलबजावणी प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल.

याठिकाणी असणार एआय कॅमेरे

मेरशी पणजी, बिर्ला क्रॉस वेर्णा, बाळ्ळी, ओल्ड मार्केट सर्कल फातोर्डा, टाटा शोरूम नुवे, गोवा सिरॅमिक्स नुवे, गोरवोटी नुवे, नुवे बायपास, आर्ले सर्कल मडगाव, बोल्शे सर्कल घोगळ, पॉवर सर्कल नावेली हाऊस, मिसिंग लिंक लोटली, पॉवर हाऊस सर्कल नावेली मुंज विहार सर्कल मडगाव, टायटन वेर्णा, आयएफबी वेर्णा, रवी कॅफे वेर्णा, पंचायत चिखली वास्को, वेताळभाटी सासष्टी, ग्रीन हाऊस कोलवा, मारिया हॉल बणावली, आंबेडकर सर्कल कुडचडे, तार बस्तोडा म्हापसा, एकोशी म्हापसा आणि धुळेर म्हापसा.

असा होणार दंड

वाहतूक नियमभंग पहिल्यावेळी दंड नंतरचा दंड

वाहन चालवताना

मोबाईल फोन वापरणे १,००० १०,०००

सिग्नल तोडणे ५०० १,५००

सीट बेल्ट न लावणे १,००० १,०००

हेल्मेट न घालणे १,००० १,०००

अतिवेग (एलएमव्ही) १,००० १,०००

अतिवेग (जड वाहने) २,००० २,०००

आपत्कालीन वाहनाला

मार्ग न देणे १०,००० १०,०००

बेकायदेशीर पार्किंग ५०० १,५००

दुचाकीवर दोनपेक्षा अधिक बसवणे १,००० १,०००

धोकादायक ओव्हरटेकिंग ५०० १,५००

वनवेतून वाहन नेणे ५०० १,५००

धोकादायक ड्रायव्हिंग १,००० १०,०००

मालवाहकमधून प्रवासी वाहतूक ५०० १,५००

फॅन्सी नंबर प्लेट ५०० १,५००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT