पणजी: भाजपचे दक्षिणेतील फायखंड युवक नेतृत्व म्हणून असलेले खासदार तेजस्वी सूर्या यांनी इतिहास नोंदवत समुद्रात पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तिहेरी स्पर्धा प्रकारातील अत्यंत आव्हानात्मक मानली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे राजकारणासह खासदार सूर्या यांनी क्रीडा क्षेत्रातही आपली चौफेर घोडदौड सुरू ठेवली आहे.
क्रीडा प्रकारातील अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेकडे पाहिले जाते. या स्पर्धेत एकाच वेळी स्पर्धकाला ठराविक वेळेत १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग करणे आणि २१.१ किलोमीटर धावावे लागते. त्यामुळे स्पर्धकाच्या दृष्टीने या स्पर्धेत अपार कष्ट, मेहनत आणि सरावातील सातत्याचे मोठे आव्हान पेलावे लागते.
३४ वर्षीय तेजस्वी सूर्या यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९० रोजी माजी सनदी अधिकाऱ्यांच्या घरी झाला. त्यांचे काका एल. ए. रवी सुब्रमण्यम हे तीन वेळेला आमदार होते. तेजस्वी सूर्या सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होते. नंतर ते भारतीय युवा जनता मोर्चामध्येही कार्यरत होते. सध्या ते भारतीय युवक जनता मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
त्यासोबतच दक्षिण बेंगळूरचे खासदारही आहेत. आपली राजकारणातील चढती कमान कायम राखत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील आपल्या चमकदार कामगिरीसाठीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा म्हणून मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत २०२२ मध्ये रिले संघात त्यांनी सहभाग नोंदवून विक्रमी वेळेमध्ये ९० किलोमीटर सायकलिंग केले होते. यावर्षी त्यांनी पूर्ण आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा त्यांनी ८ तास २७ मिनिटे आणि ३२ सेकंदात पूर्ण केली. स्पर्धेत सुरुवातीलाच समुद्रातील पोहणे हे मोठे आव्हान असते. यात सूर्या यांना थोडा जास्तीचा वेळ लागला. हे अंतर त्यांनी ५७ मिनिटे २३ सेकंदांमध्ये पार केले, दिवसभरातील दमट आणि उष्ण हवामानाचा सर्व स्पर्धकांना त्रास झाला. सूर्या यांनाही सायकलिंग आणि धावण्याच्या स्पर्धेसाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागले. सायकलिंगमधील ९० किलोमीटरचे अंतर ४ तास ६. मिनिटे आणि ४० सेकंदांमध्ये, तर २१.१ किलोमीटर धावण्याचा टप्पा २ तास ५६ मिनिटे आणि १२ सेकंदांमध्ये पूर्ण केला.
या स्पर्धेत स्पर्धकांचा सर्वाथनि कस लागतो. समुद्रातील पोहणे, त्यानंतर दीर्घ टप्प्याचे सायकलिंग आणि शेवटी २१.१ किलोमीटर धावणे, यासाठी स्पर्धकाला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागते. यामागे खडतर कष्टही असतात. सुरुवातीला सोपी वाटणारी स्पर्धा उन्हामुळे अधिक कष्टमय बनत गेली, पण जिंकण्याचे महत्त्वाकांक्षा आणि हुरूप कायम असल्याने ही स्पर्धा मी जिंकलीच, असे आयर्नमॅन विजेते खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.