CM Dr. Pramod sawant 
गोवा

Goa News : राज्यात ६२२ कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी, ३१८० रोजगारांची अपेक्षा; गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २७) पणजी येथील मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाच्या (गोवा-आयपीबी) ४२व्या बैठकीत विविध क्षेत्रांतील गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे ६२२ कोटींची गुंतवणूक होणार असून ३,१८० रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळ (जीआयडीसी)चे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मंडळाने उत्पादन, आतिथ्यसेवा, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, जहाजबांधणी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांतील विविध गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली. मंजूर प्रकल्पांमध्ये ऑटोमोबाईल घटक निर्मिती, ऑप्टिकल उपकरणांचे उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान विकास केंद्रे, प्रगत फॅब्रिकेशन युनिट्स, आतिथ्यसेवा प्रकल्प, शैक्षणिक संस्था तसेच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रातील हितधारक, संभाव्य गुंतवणूकदार आणि सरकारी अधिकारी यांच्याशी व्यापक सल्लामसलत करून तयार करण्यात आलेल्या मोठ्या उद्योगांसाठीच्या प्रस्तावित प्रोत्साहन योजनेवरही मंडळाने चर्चा केली. ही योजना पुढील मूल्यांकन व मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे, नवोन्मेषाला चालना देणे, दर्जेदार गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगारनिर्मिती वाढविणे यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. या नव्या गुंतवणूक प्रस्तावांमुळे गोव्याच्या 'स्वयंपूर्ण गोवा' अभियानाला गती मिळण्याबरोबरच राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT