Goa Carnival 2026 news  
गोवा

Goa Carnival 2026 news | पर्वरीत पारंपरिक कार्निव्हलचा जल्लोष; इंधनमुक्त चित्ररथांनी जिंकली पर्यटकांची मने

पुढारी वृत्तसेवा

शेखर वायंगणकर

पर्वरी: गेल्या वर्षीच्या खंडानंतर यंदा गोव्यात कार्निव्हल उत्सवाचा नवा आणि तितकाच पारंपरिक अवतार पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात यांत्रिक वाहने आणि कर्णकर्कश आवाजाला फाटा देऊन 'इको-फ्रेंडली' संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे.

बैलगाडीतून किंग मोमोचे आगमन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे किंग मोमो सॅड्रीक डिकॉस्ता. त्यांनी कोणत्याही आधुनिक वाहनाचा वापर न करता पारंपारिक बैलगाडीतून जनतेला अभिवादन केले. "वाहतुकीची कोंडी टाळून आणि पर्यावरणाचा समतोल राखून हा उत्सव साजरा होत असल्याचा आनंद आहे," असे उद्गार पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये:

  • चित्ररथ: सुमारे २० आकर्षक चित्ररथ, फॅन्सी ड्रेस आणि विविध संस्थांचा सहभाग.

  • पारंपारिकता: इंधनावर चालणारी वाहने आणि लाऊडस्पीकरचा वापर पूर्णपणे टाळला.

  • लोकसहभाग: स्थानिक कुटुंबे आणि पारंपरिक कला पथकांनी परेडची रंगत वाढवली.

  • मार्ग: आर्ट पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या मार्गावर गाणी आणि नृत्याचा उत्साह.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी पर्यटन खात्याचे अध्यक्ष केदार नाईक यांनी आमदार रोहन खंवटे यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, अमित अस्नोडकर, सोनिया पेडणेकर, विनीत परब यांच्यासह तिन्ही पंचायतींचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपारिक बँड पथके आणि लोकनृत्यांच्या तालावर अवघी पर्वरी नगरी कार्निव्हलच्या रंगात न्हाऊन निघाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT