धारबांदोडा : लोकशक्ती मजबूत असेल, तरच लोकशाही सक्षम होते. प्रत्येक नागरिकाने समाजाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. लोकांचा सहभाग, जबाबदारीची जाणीव आणि सामूहिक प्रयत्नांमधूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येऊ शकते, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल प्सापती अशोक गजपती राजू यांनी केले.
धारबांदोडा येथे आयोजित 'तुम भी चलो, हम भी चले, पावर टु पीपल' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिक सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून अशा कार्यक्रमांमुळे सामान्य माणसाचा आवाज अधिक प्रभावीपणे पुढे येतो, असेही त्यांनी आपल्या सविस्तर मनोगतात नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे, हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
समुदाय विकास, सामाजिक जनजागृती आणि नागरिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या रेझोनिया या संस्थेच्या वतीने धारबांदोडा येथे 'तुम भी चलो, हम भी चले पॉवर टु पीपल' हा विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सादरीकरण ममता चंदेल यांनी केले. लोककेंद्रित विकास, समावेशकता आणि नागरिकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर, सामाजिक कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा विधानसभेचे माननीय सभापती डॉ. गणेश गावकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, माजी राज्यसभा खासदार व भाजप कोअर कमिटी सदस्य विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य रुपेश देसाई व मोहन गावकर, धारबांदोडा पंचायत सरपंच महेश नाईक, माजी सरपंच बालाजी गावस, तसेच संपूर्ण धारबांदोडा मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच व पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सांगितले. आमदार दाजी साळकर यांनी युवक, महिला आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात गोव्यातील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून समावेशकता, सहभाग आणि लोकशक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला. शेवटी आयोजक संस्था रेझोनिया यांच्या सामाजिक कार्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. समाजात सहभाग, समावेशकता आणि लोकशक्तीची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
सर्वांगीण विकास; हाच मुख्य उद्देश : तवडकर
मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले की, 'पावर टु पीपल' ही संकल्पना केवळ घोषणापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, दर्बल व वंचित घटकांना बळ देणे आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधणे, हाच सरकारचा मुख्य उद्देश आहे. लोककलेला, संस्कृतीला आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देत सरकार लोकांच्या हातातच विकासाची सूत्रे देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि लोकशाही अधिक बळकट होते, असेही त्यांनी नमूद केले.